PCMC: पालिका मुख्यालयात दिव्यांग महिला, तृतीयपंथीयांसाठी स्वतंत्र शौचालय

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिका (PCMC) मुख्यालयात दिव्यांग महिला तसेच तृतीयपंथीयांसाठी तळमजल्यावर स्वतंत्रपणे तयार करण्यात आलेल्या आवश्यक सुविधायुक्त शौचालयाचे लोकार्पण आज (सोमवारी) महापालिका सहआयुक्त आशादेवी दुरगुडे यांच्या हस्ते करण्यात आले.

या कार्यक्रमास कनिष्ठ अभियंता दिपाली धेंडे, पल्लवी सासे, महिला कर्मचारी विमल कांबळे, सुरेखा सोमवंशी, दिव्यांग कर्मचारी आशा लांडे, तृतीयपंथी सुरक्षारक्षक परी अडकणे, सिद्धी कुंभार आदी उपस्थित होते. महापालिकेत काम करीत असलेल्या दिव्यांग तसेच तृतीयपंथी कर्मचाऱ्यांसाठी आणि अभ्यागतांसाठी सुविधायुक्त शौचालयाची आवश्यकता विचारात घेता महापालिका मुख्यालयात तळमजल्यावर स्वतंत्रपणे शौचालय तयार करण्यात आले आहे. महापालिका मुख्यालयात तळमजल्यावर दिव्यांग बांधवांसाठी देखील स्वतंत्रपणे आवश्यक सुविधायुक्त शौचालय तयार करण्याचे काम प्रगतीपथावर असून या महिनाअखेरीस ते पूर्ण होईल, अशी माहिती कार्यकारी अभियंता शिरीष पोरेडी यांनी दिली.

चिखलीतील घरकुल परिसरात पेव्हींग ब्लॉक बसवण्यास सुरुवात

दिव्यांग बांधवांसाठी महापालिकेच्या वतीने विविध योजना (PCMC) राबविल्या जात आहेत. दिव्यांग बांधवांना सर्वार्थाने स्वावलंबी बनविण्यासाठी कौशल्य प्रशिक्षण योजना राबविण्यासाठी महापालिकेने पुढाकार घेतला आहे. तसेच, विविध विकास प्रकल्प साकारताना त्यामध्ये दिव्यांग बांधवांसाठी आवश्यक सोयी सुविधा उपलब्ध असाव्यात याकडे कटाक्षाने लक्ष दिले जात आहे. दिव्यांग बांधवांना विविध कार्यालयात सहजतेने पोहोचता यावे, यासाठी योग्य रॅम्प व्यवस्था असणे गरजेचे आहे.

त्यादृष्टीनेही महापालिकेने काळजी घेतली असून महापालिका कार्यालय तसेच प्रेक्षागृह, दवाखाने, रुग्णालये, शाळा अशा महत्त्वाच्या ठिकाणी योग्य रॅम्प व्यवस्था तयार करण्यात आली आहे. ज्या ठिकाणी रॅम्प व्यवस्था नसेल अथवा योग्य पद्धतीने रॅम्प तयार करण्यात आला नसेल त्या ठिकाणी पाहणी करुन दिव्यांग बांधवांशी विचार विनिमय करुन त्यांना सोयीस्कर होईल, अशी रॅम्प व्यवस्था तयार करण्याच्या सूचना प्रशासक तथा आयुक्त शेखर सिंह यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.