Pimpri : पालिकेतील अधिकारी, कर्मचा-यांची दिवाळी होणार गोड!

प्रथा बोनस व सानुग्रह अनुदान देण्यास आयुक्तांची मान्यता

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेतील अधिकारी, कर्मचा-यांची दिवाळी गोड होणार आहे. दिवाळीसाठी 8.33 टक्के बोनस व 15 हजार रुपये सानुग्रह अनुदान दिले जाणार आहे. कर्मचा-यांबरोबरच शिक्षक व बालवाडी शिक्षकांना देखील हा लाभ दिला जाणार आहे. ही रक्कम दिवाळीपूर्वी सर्व कर्मचा-यांना मिळेल, याची तजवीज करण्याचे आदेश महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी आज (मंगळवारी) लेखा विभागाला दिले आहेत.

औद्योगिक कायद्यानुसार महासंघ व महापालिकेत 8.33 टक्के बोनस व 15 हजार रुपये सानुग्रह अनुदान देण्याबाबत 2015-16 मध्ये पाच वर्षांचा करार झाला आहे. हा करार कामगार कायद्यानुसार झाला आहे. त्यानुसार महापालिकेतील अधिकारी, कर्मचारी यांना 8.33 प्रथा बोनस व 15 हजार रुपये सानुग्रह अनुदान देण्यात येतो.
महापालिका कर्मचा-यांना दिवाळीपूर्वी बोनस व सानुग्रह अनुदानाची रक्कम देण्याची मागणी पिंपरी-चिंचवड महापालिका कर्मचारी महासंघाने केली होती. त्यासासाठी आज (मंगळवारी) आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्यासोबत कर्मचारी महासंघाची बैठक झाली. या बैठकीत बोनस देण्याचे आदेश आयुक्तांनी दिले.

मुख्यलेखापाल जितेंद्र कोळंबे, कामगार कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त  चंद्रकांत इंदलकर, कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष बबन झिंजुर्डे, महासचिव चारुशिला जोशी, कार्याध्यक्ष मनोज माछरे, महाद्रंग वाघेरे, नितीन समगीर, दिगंबर चिंचवडे, विशाल भुजबळ, सुनिल विटकर बैठकीला उपस्थित होते.

पिंपरी-चिंचवड महापालिका आस्थापनेवर सुमारे साडेसात हजार अधिकारी व कर्मचारी कार्यरत आहेत. तर बालवाडी, प्राथमिक व माध्यमिक शिक्षकांची संख्या सुमारे दीड हजार आहे. पालिकेतील सर्व वर्ग 1 ते 4 मधील अधिकारी व कर्मचा-यांना तसेच रजा राखीव वैद्यकीय अधिकारी व रजा राखीव परिचारिकांना 8.33 टक्के प्रथा बोनस व 15 हजार रुपये सानुग्रह अनुदान देण्यात येणार आहे. याचा लाभ महापालिकेत मानधन तत्वावर काम करणा-या कर्मचा-यांना देखील दिला जाणार आहे. यामध्ये राखीव वैद्यकीय अधिकारी, राखीव नर्सेस, शिक्षण विभागातील अधिकारी, कर्मचारी, समूह संघटक यांचा समावेश आहे.

याशिवाय 2017-18 या आर्थिक वर्षात महापालिका सेवेत कार्यरत असलेले व सध्या निवृत्त झालेल्या अधिकारी व कर्मचा-यांना देखील सहा महिन्यांच्या कालावधीच्या निकषानुसार हा लाभ दिला जाणार आहे. सेवा निलंबित अधिकारी व कर्मचा-यांना देखील याचा लाभ मिळणार आहे. सन 2018-19 च्या अंदाजपत्रकामध्ये बोनस व सानुग्रह अनुदान लेखाशिर्षाखाली केलेली तरतूद अपुरी पडल्यास तरतूद वर्गीकरणाची नियमाधीन कार्यवाही करावी.

बोनस व सानुग्रह अनुदानाची रक्कम सर्व कर्मचा-यांना दिवाळीपूर्वी मिळेल याची दक्षता घ्यावी. त्याबाबतची बिले तयार करुन तातडीने लेखा विभागाकडे सादर करावीत. लेखाविभागाने तातडीने बिले तपासून धनादेश देण्याची कार्यवाही करावी. बिलाच्या विलंबाबात संबंधित शाखाप्रमुख यांना जबाबदार धरण्यात येईल, असेही आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी याबाबतच्या आदेशात म्हटले आहे.

घंटागाडी कर्मचा-यांच्या सानुग्रह अनुदानात वाढ!

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या घंटागाडी कर्मचा-यांना यंदा दिवाळीसाठी 20 हजार रुपये बक्षीस रक्कम दिली जाणार आहे. पिंपरी महापालिकेच्या घंटागाडी कर्मचा-यांना गेल्यावर्षी 15 हजार रुपये सानुग्रह अनुदान देण्यात आले होते. या रकमेत यंदा वाढ करण्याची या कर्मचा-यांची मागणी होती. त्यानुसार गेल्या वर्षीच्या तुलनेत यात पाच हजाराने वाढ देण्यात आली आहे. घंटागाडी कर्मचा-यांना यामुळे यंदा 20 हजार रुपये सानुग्रह अनुदान देण्यात येणार आहे. या खर्चास स्थायी समितीने नुकतीच मान्यता दिली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.