Pimpri : ‘वायसीएम’ रुग्णालयातील डॉक्टरांच्या बेपर्वाईमुळे तरुणाचा मृत्यू

दोषी डॉक्टरांवर कडक कारवाई करा; राष्ट्रीय श्रमिक आघाडीचे अध्यक्ष यशवंत भोसले यांची मागणी

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वायसीएमएच्‌ रुग्णालयातील डॉक्टरांच्या अक्षम्य बेपर्वाई आणि प्रशासनाच्या ढिसाळपणामुळे गरीब घरातील एका 19 वर्षीय मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याचा आरोप करत या प्रकरणातील दोषी डॉक्टरांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी राष्ट्रीय श्रमिक आघाडीचे अध्यक्ष यशवंत भोसले यांनी महापालिकेकडे केली आहे. 

याबाबत आयुक्त श्रावण हर्डीकर यांना निवेदन देण्यात आले आहे. त्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत भोसले यांनी सांगितले की, घोडेगाव येथील गणेश गव्हाणे या तरुणाचा दुचाकीवरुन पडून रविवारी (दि.14) अपघात झाला. त्याला उपचारासाठी तातडीने वायसीएमएच्‌ रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.  त्याच्या हानवटीला मार लागला होता. रक्तश्राव होत होता. त्यामुळे वैद्यकीय अधिकारी डॉ. सुहास जगदाळे यांना रुग्णाचा रक्तश्राव जास्त होत असल्याचे सांगून स्वत: तपासणी करण्याची विनंती केली. परंतु, डॉक्टरांना बोलवित असल्याचे सांगत त्यांनी तपासणी केली नाही. कोणत्याही डॉक्टरांनी तप्तरता दाखविली नाही. गणेश याला वेळेत उपचार मिळाले नाहीत. डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळेच त्याचा बळी गेला आहे, असा आरोप भोसले यांनी केला.

गणेश हा अतिशय अतिशय गरीब शेतकरी कुटुंबातील होता. तो एकटाच कमविता होता. त्याच्या मृत्यूने कुटुंबीयांवर दुख:चा डोंगर कोसळाला आहे. त्याच्यावर उपचार करण्यास हलगर्जीपणा करणा-या डॉक्टरांवर कडक कारवाई करण्यात यावी, अशी मागणी भोसले यांनी केली. मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याबाबत गणेश याच्या कुटुंबीयांशी चर्चा करुन पुढील कार्यवाही केली जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

वायसीएमएच्‌मध्ये डॉक्टरांची कमतरता आहे. रात्र पाळीला एकच डॉक्टर असतो. शिकाऊ डॉक्टरांवर वायसीएमएचचे काम सुरु आहे. तसेच डॉक्टरांचे कामावर लक्ष नसते. डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे वायसीएमएच्‌मधील रुग्णांचे वारंवार मृत्यू होत आहेत. ठेकेदार, कंत्राटदार आणि शिकाऊ डॉक्टरांच्या विळख्यात वायसीएमएच्‌ रुग्णालय सापडले असल्याचा आरोपही त्यांनी केला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.