PCMC : सोसायटीतील थकबाकीदारांचे नळ कनेक्शन पालिकेने तोडावे; कमिटी तोडणार नाही

एमपीसी न्यूज –  ज्या सोसायट्यांमधील मालमत्ताकर थकीत (PCMC) आहे अशा सभासदांचे नळ कनेक्शन कट करण्यासाठीची यादी आणि ते कट करण्यासाठी तीन दिवसाची मुदत देण्यात आलेल्या नोटीसा देण्यात आल्या आहेत. परंतु, पाणी हा नागरिकांचा मूलभूत अधिकार असल्यामुळे आम्ही महापालिकेची ही मागणी धुडकावून लावत आहोत. आम्ही स्वतः सोसायटीची कोणतीही मॅनेजमेंट कमिटी कोणत्याही सदस्यांचे नळ कनेक्शन कट करणार नाही. पालिकेच्या प्रशासनानेच आमच्या सोसाट्यांमधील थकबाकीदार सभासदांचे  नळ कनेक्शन पालिकेच्या खर्चाने कट करावेत. त्यानंतर सदर सभासदांनी पूर्ण  मालमत्ता कर भरल्यानंतर ते कनेक्शन जोडून  द्यावेत अशी मागणी, चिखली-मोशी -पिंपरी चिंचवड हाऊसिंग सोसायटी फेडरेशनचे अध्यक्ष संजीवन सांगळे यांनी केली.

Pune : मोदी सरकार रडीचा डाव खेळत आहे; पृथ्वीराज चव्हाण यांचा हल्लाबोल

याबाबत आयुक्त शेखर सिंह यांना निवेदन दिले आहे. त्यात सांगळे यांनी म्हटले आहे की, महापालिकेकडून पिंपरी-चिंचवड शहरातील बऱ्याच सोसायट्यांमधील मालमत्ता कर थकबाकीदारांच्या अंतर्गत नळ कनेक्शन तोडण्याबाबत न्यायालयाच्या आदेशाचा हवाला देऊन ही सर्व जबाबदारी सोसायट्यांच्या  मॅनेजमेंट कमिटीवर आपण टाकलेली आहे. परंतु, आम्ही कोणत्याही न्यायालयाच्या निर्णयाचा अवमान करत नाही, परंतु आमच्या आकलनाप्रमाणे पाणी हा नागरिकांचा मूलभूत अधिकार आहे. नागरिकांच्या कोणत्याही मूलभूत अधिकारावर गदा आणणे हे नागरिकांना घटनेने दिलेल्या मूलभूत अधिकाराच्या विरोधात आहे असे आम्हाला वाटते. त्यामुळे शहरातील कोणत्याही गृहनिर्माण संस्थेतील कोणतीही मॅनेजमेंट कमिटी त्यांच्या सोसायटीमधील कोणत्याही मालमत्ता कर थकबाकीदारांचे नळ कनेक्शन स्वतः कट करणार नाही.

आपण दिलेल्या पत्रामध्ये सोसायटीच्या मॅनेजमेंट कमिटीला 3 दिवसाचा अवधी (PCMC) दिला आहे .परंतु शहरातील कोणत्याही सोसायटीची कमिटी आपणाला सहकार्य करणार नाही आणि कोणत्याही थकबाकीदार सभासदांचे नळ कनेक्शन कट करण्यासाठी विरोध ही करणार नाही. त्यामुळे  महापालिकेच्या यंत्रणेकडूनच सोसायटीमध्ये असणाऱ्या थकबाकीदार सदस्यांचे नळ कनेक्शन पालिकेच्या खर्चाने कट करावेत. त्यानंतर सदर सभासदांनी त्यांचा पूर्ण मालमत्ता कर भरल्यानंतर त्यांचे नळ कनेक्शन महानगरपालिकेच्या खर्चानेच पूर्ववत करून देण्यात यावे. या सर्व गोष्टी आपल्या महानगरपालिकेकडून पालन केल्या जाणार असतील तर आणि तरच आमच्या फेडरेशन कडून आपल्या शहरातील सोसायटीमधील थकबाकीदारकांचे नळ कनेक्शन कट करण्यासाठी सहकार्य केले जाईल.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.