Pimpri: स्वच्छ सर्वेक्षणच्या जाहिरातीसाठी पालिका उडविणार हेलियमचे फुगे

एमपीसी न्यूज – ‘स्वच्छ सर्वेक्षण 2020’ बाबतची जनजागृती आता हायड्रोजन किंवा हेलिअम बलून्सद्वारे केली जाणार आहे. त्यासाठी पावणेसहा लाख रुपये खर्च येणार आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिकेतर्फे ‘स्वच्छ सर्वेक्षण 2020’ हे नागरी अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानाबाबत जनतेमध्ये जागृती व्हावी आणि पिंपरी-चिंचवड शहर अधिक स्वच्छ व्हावे, यासाठी या अभिनयाची जनजागृती हायड्रोजन किंवा हेलियम बलून्सद्वारे करण्याचा निर्णय महापालिका प्रशासनातर्फे घेण्यात आला आहे.

त्यामुळे हे कामकाज कोटेशन पद्धतीने करण्यासाठी 28 नोव्हेंबर ते 2 डिसेंबर या कालावधीत दरपत्रक मागविण्यात आले. त्यानुसार एकूण चार संस्थांनी दरपत्रक सादर केले. त्यामध्ये सर्वाधिक कमी दर मेसर्स ट्रू व्हीजन ग्राफिक्स यांचे प्राप्त झाले. त्यामुळे त्यांच्याकडूनच ‘स्वच्छ सर्व्हेक्षण 2020’ बाबतची जनजागृती हायड्रोजन किंवा हेलिअम बलून्सद्वारे करून घेण्यात येणार आहे. या अभियानांतर्गत महापालिका मुख्य इमारत, तसेच आठ क्षेत्रीय कार्यालय आणि यशवंतराव चव्हाण स्मृति रुग्णालय अशा दहा इमारतींवर हे बलून्स लावून जनजागृती करण्यात येणार आहे.

या कामासाठी संस्थेला 15 फूट आकाराच्या प्रति बलून 47 हजार 500 रुपयांनुसार 4 लाख 75 हजार रुपये, तर बलूनच्या रिफिलींगसाठी प्रतिनग 2200 रुपये नुसार 50 रिफीलींगसाठी 1 लाख 10  हजार रुपये देण्यात येणार आहेत. असा एकूण 5 लाख 85 हजार रुपये इतका खर्च ‘स्वच्छ सर्व्हेक्षण 2020’ बाबतची जनजागृती हायड्रोजन किंवा हेलिअम बलून्सद्वारे करण्यासाठी येणार आहे. त्याला स्थायी समिती सभेने मंजुरी दिली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.