Talegaon News : तळेगाव-चाकण रस्त्यावर अवजड वाहनांना दिवसभर कायमस्वरूपी बंदी घाला – प्रदीप नाईक

एमपीसी न्यूज – तळेगाव-चाकण रस्त्यावरील वाहतूक कोंडी आणि जीवघेणे अपघात टाळण्यासाठी सकाळी सात ते रात्री नऊ या काळात अवजड वाहनांच्या वाहतुकीस कायमस्वरूपी बंदी घालावी, अशी मागणी महाराष्ट्र भ्रष्टाचार निर्मूलन समितीचे पुणे जिल्हा अध्यक्ष माहिती अधिकार कार्यकर्ते प्रदीप नाईक यांनी केली आहे.

या संदर्भात पोलीस उपायुक्त सुधीर हिरेमठ यांना त्यांनी दिले आहे. दिवाळीची खरेदी करून निधालेल्या मायलेकींच्या दुचाकीला कंटेनरची धडक बसून तळेगाव स्टेशन चौकाजवळ झालेल्या अपघातात महिलेचा मृत्यू झाला. या पार्श्वभूमीवर चाकण रस्त्यावरील रस्ते सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या पार्श्वभूमीवर नाईक यांनी ही मागणी केली आहे.

चाकण एमआयडीसीत जाणारे व येणारे मोठे कंटेनर, ट्रेलर, मालवाहू ट्रक यांची संख्या मोठी असून या अवजड वाहनांना सकाळी सात ते संध्याकाळी सात प्रवेशबंदी असतानाही त्याचे काटेकोर पालन होताना दिसत नाही. त्यामुळे रस्त्यावर वाहतूक कोंडी होण्याबरोबर अनेक निष्पाप जीवांचा आतापर्यंत बळी गेला आहे.

तळेगाव-चाकण रस्त्यावर सकाळी सात ते रात्री नऊ दरम्यान अवजड वाहनांना कायमस्वरूपी बंदी घालावी व त्याची कडक अंमलबजावणी करावी. या काळात रस्त्यावर कोणतेही अवजड वाहन आढळल्यास संबंधित वाहनचालकाबरोबरच त्या काळात सेवेवर असलेल्या वाहतूक पोलिसांवरही कठोर कारवाई करावी, अशी मागणी नाईक यांनी केली आहे.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.