Petrol Diesel : सलग दुस-या दिवशी पेट्रोल, डिझेलचे दर स्थिर; नागरिकांना दिलासा

एमपीसी न्यूज – देशभर पेट्रोल, डिझेल वाढीच्या संकटाने सर्वसामान्य हवालदिल झाले. 17 दिवसात 14 वेळा किमती वाढल्या असून या कालावधीत तब्बल 10 रुपयांनी पेट्रोल महागले आहे. यानंतर मागील दोन दिवसांपासून पेट्रोल, डिझेलचे दर स्थिर आहेत. काही दिवसात एकदम 10 रुपयांनी सर्वसामान्य नागरिकांचे कंबरडे मोडले असले तरी दोन दिवसात नागरिकांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे.

मुंबई शहरात पेट्रोल 120.51 रुपये प्रति लिटर तर डिझेल 104.77 रुपये प्रति लिटर प्रमाणे विकले जात आहे. तर देशाची राजधानी दिल्लीत पेट्रोल 105.41 रुपये प्रतिलिटर तर डिझेलची किंमत 96.67 रुपये प्रति लिटर आहे.

देशात पाच राज्यांच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरु असताना आंतरराष्ट्रीय बाजारात कच्या तेलाच्या किमती वाढत असताना सुद्धा इंधन दर चार महिने स्थिर राहिले. निवडणुका झाल्यानंतर काही दिवसांनी म्हणजेच 22 मार्च पासून पेट्रोल, डिझेल आणि सीएनजीच्या किमती वाढू लागल्या.

17 दिवस किमती वाढत राहिल्या. या काळात तब्बल 14 वेळा किमती वाढल्या. सुमारे 10 रुपयांनी पेट्रोल, डिझेलच्या किमती वाढल्या. सध्या दिल्ली, मुंबई, चेन्नई आणि कोलकाता या चार प्रमुख शहरांमध्ये मुंबईत सर्वाधिक दराने पेट्रोल, डिझेल विक्री होत आहे. दोन दिवसांपासून पेट्रोल, डिझेलच्या किमती स्थिर राहिल्याने काही प्रमाणात का होईना नागरिकांना दिलासा मिळाला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.