Pimpri : 11 वर्षीय मुलाने दिले 16 वर्षीय मुलाला हृदय; 3 तासांत आव्हानात्मक शस्त्रक्रिया डॉक्टरांनी केली यशस्वी

एमपीसी न्यूज – मेंदूमृत झालेल्या अकरा (Pimpri) वर्षीय मुलाचे हृदय सोळा वर्षीय मुलाला दान करण्यात आले. ही हृदय प्रत्यारोपण शस्त्रक्रिया पिंपरी येथील डीपीयु सुपर स्पेशालिटी रुग्णालयात यशस्वीपणे पार पडली. मागील दोन वर्षांपासून हृदयासाठी धडपडणाऱ्या मुलाला यामुळे जीवनदान मिळाले आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, सोळा वर्षाच्या अमितला (नाव बदलले आहे) अवघ्या अकरा वर्षाच्या मुलाने हृदय दान करून जीवदान दिले. पिंपरीच्या डीपीयू सुपर स्पेशालिटी रुग्णालयात ही गुंतागुंतीची हृदय प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया नुकतीच यशस्वी झाली. त्यामुळे सोळा वर्षाच्या अमितच्या शरिरात पुन्हा हृदय धडधडू लागले. त्यामुळे पालकांच्या चेहऱ्यावर आनंद गगनात मावेनासा झाला. अमितच्या हृदयाचे स्नायू कमकुवत झाल्याने हृदय निकामी झाले होते. डीपीयू सुपर स्पेशालिटी रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू होते. तो गेल्या दोन वर्षापासून हृदयाच्या प्रतीक्षेत होता.

एका रुग्णालयात रस्त्यावरील अपघातात मेंदूमृत (ब्रेनडेड) झालेल्या 11 वर्षाच्या लहानग्या मुलाचे सात फेब्रुवारीला हृदय मिळाले. अमितच्या पालकांच्या संमतीने डीपीयू सुपर स्पेशालिटी रुग्णालयाच्या तज्ज्ञ डॉक्टरांच्या एका पथकाने त्या रुग्णालयात जाऊन अवयव आणले. त्यासाठी पिंपरीच्या डीपीयू सुपर स्पेशालिटी रुग्णालयापासून ते त्या रुग्णालयापर्यंत ग्रीन कॉरिडॉर करण्यात आले होते. तज्ज्ञांनी हृदयाचे अवयव आणले असले तरी त्याचे अवघ्या चार तासांमध्ये प्रत्यारोपण करणे हे मोठे आव्हानात्मक असे काम होते.

डीपीयू सुपर स्पेशालिटी रुग्णालयाच्या हृदयशल्य चिकित्सा विभागाचे प्रमुख डॉ. अनुराग गर्ग यांनी हृदयप्रत्यारोपण शस्त्रक्रियेचे नेतृत्व केले. अवयव आणून चार तासात प्रत्यारोपण करणे गरजेचे असताना रुग्णालयातील तज्ज्ञ डॉक्टरांनी अवघ्या तीन तासांमध्ये प्रत्यारोपण पूर्ण करून दाखविले. अवयव दात्याचे ह्रदय अमितचे शरीर स्वीकारते की नाही हे तपासण्यासाठी प्रत्यारोपणापूर्वीच डॉक्टरांनी त्याची रोगप्रतिकारशक्तीची तीव्रता कमी केली. तसेच प्रत्यारोपणानंतर हृदय व्यवस्थित कार्य करते की नाही हेही तपासून पाहिले. प्रत्यारोपणानंतर तीन आठवड्यापर्यंत अमितला तज्ज्ञ डॉक्टरांच्या निरीक्षणाखाली ठेवण्यात आले होते.

डीपीयू सुपर स्पेशालिटी रुग्णालयाच्या औषधनिर्माणशास्त्र, हृदयरोग, तसेच सीव्हीटीएस विभागाच्या तज्ज्ञ डॉक्टरांनी अमितच्या प्रत्यारोपणानंतर बदलांवर लक्ष  ठेवले. या (Pimpri) यशस्वी प्रत्यारोपणामध्ये हृदयरोग विभागाचे डॉ. आशिष डोळस, डॉ. रणजित पवार, हृदयरोग भूलतज्ज्ञ डॉ. विपूल शर्मा, डॉ. शाहबाज हसनेन, हृदयरोग विभागाचे प्रमुख डॉ. एस. के. मलानी, तसेच क्रिटिकल केअर मेडिसीनचे डॉ. प्रशांत साखवळकर, डॉ. असीर तांबोळी यांच्या पथकाचा समावेश होता.

पिंपरीच्या डीपीयू सुपर स्पेशालिटी रुग्णालयाच्या कार्डिओथोरॅसिक शस्त्रक्रिया विभागाचे प्रमुख डॉ. अनुराग गर्ग म्हणाले, ‘एका युवकाला आम्ही जीवदान देऊ शकलो याचा आम्हाला अभिमान वाटत आहे. प्रत्यारोपण केल्यानंतर दात्याचे हृदय रुग्णाचे शरीर स्वीकारते की नाही याची आम्हाला धास्ती होती. मात्र, दात्याचे हृदय रुग्णाच्या शरिराने स्वीकारले आणि ते कार्यरत ही झाले. ह्या यशस्वी प्रत्यारोपणामुळे आम्हाला खूपच आनंद झाला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.