Pune Lonavala Local : पुणे-लोणावळा लोकल सेवेला 46 वर्ष पूर्ण

एमपीसी न्यूज – पुणे लोणावळा दरम्यान सुरू (Pune Lonavala Local) असलेल्या उपनगरीय रेल्वे सेवेला नुकतीच (11 मार्च 2024) 46 वर्ष पूर्ण झाली. सुरुवातीला सात डब्यांची असलेली लोकल आता बारा डब्यांची झाली आहे. मागील 46 वर्षात लोकल सेवेमध्ये मोठा बदल झाला आहे. 46 व्या वर्धापन दिनानिमित्त पुणे लोणावळा लोकलचे पूजन झाले. पुणे रेल्वे स्थानकात लोकलची सजावट करून तिला मार्गस्थ करण्यात आले.

दररोज लाखो प्रवाशांची ने-आण करणारी लोकल लोहमार्गाच्या आजूबाजूच्या गावांमध्ये आर्थिक सधनतेचे कारण बनली आहे. पुणे, पिंपरी-चिंचवड शहरात शिक्षण, नोकरी, व्यवसायानिमित्त जाणारे अनेकजण पुणे लोणावळा लोहमार्गालगत असलेल्या तळेगाव, वडगाव, कान्हे, कामशेत, मळवली आधी ठिकाणी वास्तव्यास आहेत. त्यामुळे या भागाचा आपसूक विकास होऊ लागला आहे

11 मार्च 1978 रोजी पुणे ते लोणावळा दरम्यान उपनगरीय ईएमयु लोकल सेवेला आरंभ झाला. 1978 ते 2007-8 सालापर्यंत पुणे लोकल ही डीसी (डायरेक्ट करंट) लोकल म्हणून धावत होती. सुरुवातीला लोकलला अवघे सात डबे होते. काही वर्षानंतर दोन डबे वाढवून नऊ डब्यांची लोकल धावू लागली. त्यात पुन्हा वाढ करून आता 12 डब्याची ईएमयु लोकल धावत आहे.

मागील 46 वर्षात एकदाही पुण्याला नवीन फ्रेश फॅक्टरी आऊट ईएमयु रेक मिळाला नाही. मुंबई उपनगरात वापरून पुण्याला दिलेल्या जुन्या रेक मधूनच पुणे-लोणावळा प्रवास होत आहे. 2009-10 मध्ये भेल चा रेक पुण्याला मिळाला. 2014-15 मध्ये एसी (अल्टरनेट करंट) ईएमयु धावू लागली. 2015 ते 2018 या काळात रेट्रोफिटेड रेकचा वापर करून लोकल धावू लागली. 2018 ते आत्तापर्यंत सिमेन्स रेक पुणे ते लोणावळा (Pune Lonavala Local) दरम्यान धावत आहे.

Maval : श्री संत रोहिदास महाराज भवन सीमा भिंत बांधकामांचे आमदार सुनील शेळके यांच्या हस्ते भूमिपूजन

46 वर्ष पूर्ण होत असताना यंदा तरी पुण्याला बंबार्डिअर किंवा मेधा ईएमयुचा नवीन रेक मिळावा, अशी अपेक्षा प्रवाशांकडून व्यक्त होत आहे. तसेच गेली 46 वर्षात पुणे लोणावळा लोकलच्या फेऱ्यांमध्येही वाढ झालेली नाही. आता स्वयंचलित सिग्नल यंत्रणेचे काम लोणावळा ते पुणे दरम्यान पुर्ण झाल्याने प्रवाशांकडून कार्यालयीन वेळेत लोकलच्या फेऱ्या वाढवण्याची मागणी होत आहे. तसेच सर्वच स्टेशनवरील फलाटांची लांबी वाढवली असल्याने सकाळच्या व सायंकाळच्या काही फेऱ्या या 15 डब्यांच्या लोकलने पण चालवता येऊ शकतील, अशी आशा देखील प्रवाशांकडून व्यक्त केली जात आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.