Pimpri : 133 नगरसेवकांना ‘चोपून काढा’ म्हणणाऱ्या लघुलेखकावर गुन्हा दाखल करा

सर्वपक्षीय नगरसेवकांची पोलीस आयुक्तांकडे मागणी

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेतील 133 नगरसेवकांना ‘चोपून काढा’ असे म्हणणा-या लघुलेखकावर तातडीने गुन्हा दाखल करण्याची मागणी सर्वपक्षीय नगरसेवकांनी केली आहे. अधिकारी भर सभेत नगरसेवकांना चोपून काढण्याची भाषा कसा करु शकतो, असा सवाल नगरसेवकांनी केला आहे.

नगररचना व विकास विभागाचे उपसंचालक प्रकाश ठाकुर यांचे लघुलेखक म्हणून कार्यरत असलेले रावसाहेब राठोड यांनी नगरसेवकांना ‘चोपून काढा’ अशी भाषा केली होती. याबाबत पोलीस आयुक्त आर. के. पद्मनाभन यांना पत्र देऊन राठोड यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. नगरसेवक जनतेचे सेवक आहेत. त्यामुळे ते जनतेची कामे करण्याची अधिका-यांना विनंती करतात. शिवसेना गटनेते राहुल कलाटे यांनी देखील अभियंता अनिल राऊत यांना सोमवारी (दि.11) काम सांगितले होते. परंतु, दोन दिवसांनी म्हणजेच बुधवार (दि.13) राऊत यांनी तक्रार दाखल केली होती.

त्यानंतर महापालिकेतील कर्मचारी महासंघाने राऊत यांच्या समर्थनार्थ प्रवेशद्वारासमोर आंदोलन केले. आंदोलना दरम्यान लघुलेखक रावसाहेब राठोड यांनी नगरसेवकांना ‘चोपून काढा’ अशी भाषा वापरली. नगरसेवक जनतेचे सेवक आहेत. सेवकांना ठोकून काढा म्हणणे चुकीचे आहे. त्यामुळे राठोड यांच्यावर तातडीने दखलपात्र गुन्हा दाखल करण्यात यावी, अशी मागणी सर्वपक्षीय नगरसेवकांनी केली आहे.

विरोधी पक्षनेते दत्ता साने, राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नगरसेवक भाऊसाहेब भोईर, मनसे गटनेते सचिन चिखले, मोरेश्वर भोंडवे, राजू मिसाळ, भाजपचे उत्तम केंदळे, संदीप कस्पटे, संदीप वाघेरे, नवनाथ जगताप, अमित गावडे, सचिन भोसले, मीनल यादव, पौर्णिमा सोनवणे, रेखा दर्शिले, अश्विनी वाघमारे, कैलास बारणे, राजू बनसोडे, विक्रांत लांडे, पंकज भालेकर, शाम लांडे, निलेश बारणे यांनी निवेदनावर स्वाक्ष-या केल्या आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.