Pimpri: बैलांचे संगोपन कसे करायचे हे ‘पेटा’ संस्थेने शेतक-यांना शिकवू नये; आमदार महेश लांडगे यांचा हल्लाबोल

‘पेटा’ संस्थेविरोधात शेतक-यांमध्ये मोठा संताप; बैलगाडा शर्यतीबाबत मुख्यमंत्र्यांना भेटणार 

जिल्हाधिकारी सौरभ राव यांना दिले निवेदन 

एमपीसी न्यूज – राज्यातील शेतक-यांच्या जिव्‍हाळ्याचा विषय असलेल्या बैलगाडा शर्यती पुन्हा सुरू करण्याबाबत राज्य सरकारने बैलगाडा शर्यती सुरु करण्याबाबतचा कायदा तयार केला होता. त्याला राष्ट्रपतींनी देखील मान्यता दिली होती. परंतु, ‘पेटा’ या संस्थेच्या कार्यकर्त्यांनी त्यामध्ये खोडा घातला. बैलांची माहिती पुस्तकातून वाचणा-या ‘पेटा’ संस्थेच्या कार्यकर्त्यांनी बैलांचे संगोपन कसे करायचे हे हाडाच्या शेतक-यांना शिकवू नये. ‘पेटा’ संस्था केवळ कागदी घोडे नाचवित आहे. संस्थेला मिळालेल्या अनुदानाच्या माध्यमातून शेतक-यांना चुकीच्या पद्धतीने त्यांच्याकडून त्रास दिला जात असल्याचा, हल्लाबोल आमदार महेश लांडगे यांनी ‘पेटा’ या संस्थेवर केला. तसेच ‘पेटा’ संस्था कुणाच्या तरी सांगण्यावरुन काम करत आहे. बैलगाडा शर्यतीबाबत आपण लवकरच मुख्यमंत्र्यांना भेटणार असल्याचेही, लांडगे यांनी सांगितले. 

बैलगाडा शर्यतींना ‘पेटा’ संस्था आणि ढोंगी प्राणीमित्र जाणीवपूर्वक विरोध करत असल्याचा आरोप करत त्यांच्यावर कारवाई करण्याच्या मागणीसाठी अखिल भारतीय बैलगाडा संघटनेने आज (मंगळवारी) पुणे जिल्हाधिकारी कार्यालयावर बेमुदत राज्यव्यापी आंदोलनाला सुरुवात केली आहे. लवकर उठवा शर्यतीवरची बंदी; घाटात पळूद्या पुन्हा महादेवाचा नंदी….असा नारा देत बैलगाडा मालक आंदोलन करत आहेत. या आंदोलनात सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापुर, अलिबाग, अहमदनगर आणि पुणे परिसरातून नागरिक आपल्या सर्जा-राजासह आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी आहेत.  तसेच विदर्भातील शेतकरी देखील आंदोलनात सहभागी झाले आहे. बैलगाडा शर्यती सुरु करण्यासाठी सातत्याने पाठपुरावा करणारे भोसरीचे आमदार महेश लांडगे देखील आंदोलनात सहभागी झाले आहेत. त्यावेळी महेश लांडगे बोलत होते. दरम्यान, आमदार महेश लांडगे यांच्या नेतृत्वाखाली शेतक-यांनी आपल्या मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी सौरभ राव यांना दिले आहे. 

आमदार महेश लांडगे पुढे म्हणाले, ”बैलगाडा शर्यतीवरील बंदी उठविण्यासाठी गेल्या अनेक दिवसांपासून लढा सुरू आहे. शेतक-यांच्या जिव्हाळ्याच्या बैलगाडा शर्यतीवरील बंदी उठविण्याबाबत राज्य सरकारने कायदा तयार केला. त्याला राष्ट्रपतींची देखील मान्यता घेतली. परंतु, त्यात पेटा संस्थेने खोडा घातला. बैलगाडा शर्यतीवरील बंदी उठविण्यासाठी आम्ही सर्वोच्च न्यायालयापर्यंत पाठपुरावा करत आहोत. मात्र ‘पेटा’ वारंवार त्यामध्ये आडकाठी घालत आहे”. 

” ‘पेटा’ संस्थेबाबत शेतक-यामध्ये प्रचंड नाराजी आहे. ही नाराजी योग्य आहे. कारण, ‘पेटा’ संस्था बैल कसा साभांळावा, कसा पाळावा, कसा वाढवावा हे शेतक-यांना शिकवत आहे. शेतकरी बैलांचा सांभाळ करण्याबाबत सक्षम आहेत. बैल कसा वाढवायचा त्याचे संगोपन कसे करायचे, हे शेतक-यांपेक्षा दुसरे कोणीच समजू शकत नाही. मात्र ‘पेटा’ संस्था केवळ कागदी घोडे नाचवित आहे. संस्थेला मिळालेल्या अनुदानाच्या माध्यमातून शेतक-यांना चुकीच्या पद्धतीने त्रास दिला जात आहे”. 

”राज्य सरकारने बैलगाडा शर्यतीबाबत कायदा केला. त्याला राष्ट्रपतींनी मान्यता दिली. तो कायदा अमंलात येणार होता. ‘पेटा’ संस्थेच्या कार्यकर्त्यांनी सरकारने तयार केलेला कायदा जाणून घेणे गरजेचे होते. कायदा वाचला असता तर त्यांना देखील समाधान वाटले असते. परंतु, मला कळत नाही की त्यांना बैलगाडा शर्यतीमध्ये पडण्याची काय गरज आहे. त्यांना अनेकवेळा बैलगाडा मालक संघटनांनी चर्चेला बोलावले होते. परंतु, ते चर्चेला देखील येत नाहीत”, अशी खंतही आमदार लांडगे यांनी बोलून दाखविली. 

”शेतक-यांनी बैलांचा सांभाळ नाही करायचा म्हटल्यावर बैलांना रस्त्यावर सोडून द्यावे लागेल. शेतकरी बैलांचा अत्यंत चांगलेपणाने सांभाळ करत आहोत. पोटच्या मुलासारखे बैलाला सांभाळले जाते. बैलांबाबत ‘पेटा’ संस्थेची भावना अत्यंत चुकीची आहे”, असे सांगत आमदार लांडगे म्हणाले की, ”बैलांची माहिती या संस्थेला केवळ पुस्तकातून माहित आहे. बैल जन्माल्यापासून कसा वाढतो. काय खातो, याची माहिती देखील त्यांना नाही. ‘पेटा’च्या विरोधात आपण 100 टक्के आहोत. ‘पेटा’चे कार्यकर्ते शहाने नाहीत. ते कोणाच्या तरी सांगण्यावरुन काम करत आहेत. 

‘तमिळनाडू सरकारने कायदा तयार केला. त्यानंतर जलिकट्टू स्पर्धा चालू देखील झाल्या. तसेच महाराष्ट्र सरकारने देखील बैलगाडा शर्यती सुरु करण्याबाबतचा कायदा तयार केला होता. त्या कायद्यानुसार स्पर्धा चालू व्हाव्यात, अशी आमची मागणी होती. परंतु, त्यात काही संस्थानी आडकाठी घातली. बैलगाडा शर्यती सुरु करण्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी आपण लवकरच चर्चा करणार आहोत. मला विधानसभेत पैलवान आणि बैलगाडा मालक म्हणून ओळखले जाते. याचा मला अभिमान वाटतो”, असेही आमदार लांडगे म्हणाले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.