Pimpri : वाहनाला लावलेल्या जीपीएसमुळे वाहनासह चोरटा पोलिसांच्या जाळ्यात

एमपीसी न्यूज – वाहन चोरीचे प्रमाण रोखण्यासाठी तसेच वाहन चोरट्यांवर जरब बसविण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर आवश्यक आहे. तंत्रज्ञानाचे महत्व पिंपरी येथील एका गुन्ह्यात अधोरेखित झाले आहे. मोटारसायकलला लावलेल्या जीपीएसमुळे चोरीला गेलेली मोटारसायकल आणि तिचा चोरटा पोलिसांच्या जाळ्यात अडकला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मागील दहा दिवसांपूर्वी मोहननगर, चिंचवड येथून एक मोटारसायकल चोरीला गेली होती. त्याबाबत पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. मोटारसायकल धारकाने सुरक्षेची काळजी घेऊन मोटारसायकलला जीपीएस डिव्हाईस बसवले होते. त्यावरून पोलीस दुचाकीच्या मागावर होते.

गुन्ह्याचा तपास करत असताना पिंपरी पोलिसांच्या तपास पथकातील पोलीस हवालदार अनिल गायकवाड यांना माहिती मिळाली की, टेल्को रोड, चिंचवड येथे एक मुलगा लाल काळ्या रंगाच्या मोटारसायकलवर आला आहे. त्या मोटारसायकलला नंबर नसून ती चोरीची आहे. त्यानुसार पोलिसांनी परिसरात सापळा रचून एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले. त्याच्याकडे असलेल्या मोटारसायकल बाबत चौकशी केली असता तो उडवाउडवीची उत्तरे देऊ लागला. त्यामुळे पोलिसांनी त्याला पोलीस ठाण्यात आणले.

पोलीस ठाण्यात आणून त्याच्याकडे चौकशी केली असता त्याच्याकडे असलेली मोटरसायकल त्याने मागील दहा दिवसांपूर्वी मोहननगर चिंचवड येथून चोरल्याचे सांगितले. या व्यतिरिक्त त्याने आणखी चार दुचाकी चोरल्याचे देखील सांगितले. पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या अल्पवयीन मुलाकडून नंबर नसलेल्या पाच दुचाकी जप्त केल्या आहेत. या कारवाईमुळे वाकड पोलीस ठाण्यातील दोन, पिंपरी, देहूरोड आणि हडपसर पोलीस ठाण्यातील प्रत्येकी एक असे एकूण पाच वाहन चोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत.

अल्पवयीन वाहन चोरटा शिक्षण अथवा काम काहीही करत नाही. मौजमजा करण्यासाठी तो मोटारसायकल चोरी करीत असे. मोटारसायकल चोरल्यानंतर तिच्यातील पेट्रोल जिथे संपेल तिथे ती मोटारसायकल चोरटा पार्क करत होता. काही मोटारसायकल त्याने पैशांसाठी विकल्या होत्या. चोरी केल्यानंतर चोरटा मोटारसायकलच्या नंबर प्लेट काढत असे. मात्र, जीपीएसमुळे तो पोलिसांच्या जाळ्यात अडकला आहे. त्याच्यावर यापूर्वी देखील वाहन चोरीचे गुन्हे दाखल आहेत.

ही कारवाई पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई, अप्पर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलीस उपायुक्त स्मिता पाटील, सहाय्यक पोलीस आयुक्त रामचंद्र जाधव, वरिष्ठ पोलीस निरीक्षक मिलिंद वाघमारे, पोलीस निरीक्षक गुन्हे राजेंद्र निकाळजे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अशोक निमगिरे, पोलीस कर्मचारी अनिल गायकवाड, राजेंद्र भोसले, नागनाथ लकडे, जावेद बागसिराज, श्रीकांत जाधव, प्रतिभा मुळे, शहाजी धायगुडे, उमेश वानखेडे, रोहित पिंजरकर, रमेश दोरताले यांच्या पथकाने केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.