Pimpri: महापालिकेच्या कायदा सल्लागारपदी पुन्हा अॅड. अजय सूर्यवंशी

अतिरिक्त कायदा सल्लागारपदी अतिश लांडगे; स्थायीची आयत्यावेळी मान्यता

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या कायदा सल्लागारपदी पुन्हा अॅड. अजय सूर्यवंशी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर, अतिरिक्त कायदा सल्लागारपदी अॅड. अतिश लांडगे यांची निवड करण्यात आली आहे. सूर्यवंशी यांना दरमहा 50 हजार रुपये तर लांडगे यांना 35 हजार रुपये मानधन देण्यात येणार आहे. याबाबतचा प्रस्तावाला स्थायी समितीच्या पहिल्याच सभेत आयत्यावेळी मान्यता देण्यात आली.

पिंपरी-चिंचवड महापालिका स्थायी समितीची गुरुवार (दि.7)ची तहकूब सभा आज (शुक्रवारी) पार पडली. सभापती विलास मडिगेरी अध्यक्षस्थानी होते. या पहिल्याच सभेत 12 आयत्यावेळच्या विषयाला मान्यता देण्यात आली.

  • अॅड. अजय सूर्यवंशी यापूर्वी देखील महापालिकेत मानधनतत्वावर कायदा सल्लागार होते. परंतु, त्यांना सेवेतून कमी करण्यात आले होते. आता पुन्हा त्यांना मानधनतत्वार कायदा सल्लागारपदी घेण्यात आले आहे. त्यासोबतच अॅड. अतिश लांडगे यांची अतिरिक्त कायदा सल्लागारपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

जिजाई प्रतिष्ठान यांच्या वतीने दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी इंग्रजी, गणित आणि विज्ञान या विषयाचे चिंचवड येथे शिबिर आयोजित करण्यात आले होते. महापालिकेने माध्यमिक, खासगी शाळेतील विद्यार्थ्यांना शिबिराला ने-आण करण्यासाठी पीएमपीएलकडून 27 बस घेतल्या होत्या. त्याचे दोन लाख 16 हजार रुपयांचे भाडे पीएमपीएमएलला देण्यास मान्यता देण्यात आली.

  • त्याचबरोबर सांगवीतील करिअर महोत्सवासाठी विद्यार्थ्यांच्या प्रवासाचे बसचे भाडे (3 लाख 20 हजार) आणि केंद्र आणि राज्य सरकारच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या खेलो इंडिया युथ गेम्ससाठी बालेवाडी येथे विद्यार्थ्यांच्या प्रवासासाठी पीएमपीएमलला (64 हजार) असे एकूण 6 लाख रुपये देण्यास आयत्यावेळी मान्यता देण्यात आली.

महापालिका कार्यक्षेत्रातील 36 स्मशानभूमी, दफनभुमीतील सुरक्षा काळजीवाहक यांना एप्रिल 2018 पासून आजपर्यंतच्या किमान वेतन दरातील बेसिक व इतर भत्यात झालेल्या वाढीनुसार फरक देण्यासाठी 1 कोटी 82 लाख रुपये देण्यास मान्यता दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.