Pimpri: भाजप नगरसेवकांच्या प्रश्नांनाच मिळेना उत्तर !

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेतील सत्ताधारी भाजपच्या नगरसेवकांनाच उत्तरे मिळत नाहीत. भाजप नगरसेवक तुषार कामठे यांनी महापालिकेत प्रशिक्षण देणा-या किती खासगी संस्था कार्यरत आहेत. त्यांच्यावर आतापर्यंत खर्च किती झाला आहे, याबाबतचे प्रश्न महासभेसमोर घेण्याची मागणी महापौर राहुल जाधव यांच्याकडे केली होती. परंतु, महापौर जाधव यांनी ते प्रश्न स्वीकारले नाहीत.

महासभेत एखाद्या विषयाला अनुसरुन विविध लेखी प्रश्न विचारले जातात. त्याला प्रशासनाकडून लेखी उत्तर दिले जाते. त्यावर महासभेत सांगोपांग चर्चा केली जाते. चर्चेतून तो प्रश्न मार्गी लागतो. त्यात सुधारणा केली जाते. तथापि, गेल्या काही दिवसांपासून महापौरांकडून प्रश्नच स्वीकारले जात नाहीत. विरोधकांचे तर नाहीच नाही. तर, सत्ताधारी पक्षातील नगरसेवकांचे देखील प्रश्न त्यांच्याकडून स्वीकारले जात नाहीत.

भाजपचे नगरसेवक तुषार कामठे यांनी महापालिकेतील प्रशिक्षण संस्थाबाबत प्रश्न उपस्थित केले होते. ऑल इंडिया इन्स्टिट्‌यूट ही संस्था महिलांसाठी प्रशिक्षण देण्याचे काम केव्हापासून करते. या संस्थेने आतापर्यंत किती महिला प्रशिक्षणार्थींना प्रशिक्षण दिले. महापालिकेचा अशा प्रकारच्या प्रशिक्षण घेण्यामागचा उद्देश काय ?, या संस्थेकडून प्रशिक्षण घेऊन किती महिलांनी स्वयंरोजगार सुरु केला ? किती महिला उद्योजिका तयार झाल्या ? या संस्थेला काळ्या यादीत टाकल्यानंतरही पुन्हा कार्यान्वित करण्यामागचा हेतू व कारणे स्पष्ट करा.

महापालिकेने आजपर्यंत अशा प्रकारच्या प्रशिक्षणावर किती खर्च केला. त्याचा तपशील देण्यात यावा, असे प्रश्न कामठे यांनी विचारले होते. हे प्रश्न डिसेंबर महिन्याच्या महासभेत घेण्याची विनंती त्यांनी महापौर जाधव यांच्याकडे केली होती. परंतु, महापौर राहुल जाधव यांनी ते प्रश्न स्वीकारले नाहीत. त्यामुळे भाजप नगरसेवकांनाच उत्तर मिळत नाहीत, अशी परिस्थिती महापालिकेत निर्माण झाली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.