Pimpri: संकटातही राजकारण! राज्याऐवजी केंद्राला वेतन देत भाजपचे कुटील राजकारण- संजोग वाघेरे

एमपीसी न्यूज – देशात उद्भवलेल्या ‘कोरोना’ महामारीत राज्याला आर्थिक मदत करण्याऐवजी केंद्रातील भाजपच्या सर्वोच्च नेत्याला खूश करण्यात पिंपरी-चिंचवड शहरातील भाजप आमदार, नगरसेवक, ‘भक्तगण’ मग्न आहेत. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असल्यामुळेच भाजपने आमदार, नगरसेवकांचे एक महिन्याचे वेतन देशाच्या सर्वोच्च कारभाऱ्याकडे सोपवून कुटील राजकारण केले आहे, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे यांनी केली आहे.

वाघेरे म्हणाले की, सध्या राज्यात तसेच देशात ‘कोरोना’ व्हायरसच्या प्रादुर्भावामुळे मोठे संकट आले आहे. राज्यसरकार तसेच केंद्रसरकारने या पार्श्वभूमीवर देशवासीयांना आर्थिक मदतीचे आवाहन केले होते. त्यानुसार दानशूर व्यक्ती, संस्था, राजकीय पक्ष, विविध आस्थापनातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी आपापले एक महिन्याचे वेतन कोरोना संकटाशी लढण्यासाठी दिले.

कोरोना या संकटाशी सध्या सुरू असलेल्या लढ्यात ‘माणुसकी’चीच अपेक्षा असताना पिंपरी-चिंचवड शहरातील भाजप पदाधिकाऱ्यांनी मात्र मदतीतही ‘पक्ष’पातीपणा आणून आपल्या ओंगळवाण्या राजकारणाचे दर्शन घडवले असल्यामुळे सर्वत्र चीड व्यक्त होत आहे. ‘लॉकडाऊन’मुळे राज्याची आर्थिक परिस्थिती बिघडली असताना राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या ‘मुख्यमंत्री सहाय्यता कोरोना निधी’ ला मदत करण्याऐवजी केंद्राकडे म्हणजेच ‘प्रधानमंत्री सहाय्यता निधी’ला शहरातील दोन भाजप आमदारांसह सर्व नगरसेवकांनी आपला एक महिन्याचा पगार देऊन  ‘माणुसकी’पेक्षा पक्षच मोठा असल्याचे दाखवून दिले आहे, असेही वाघेरे यांनी म्हटले आहे. तर, राष्ट्रवादीच्या 38 नगरसेवकांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीस मानधन दिल्याचेही त्यांनी सांगितले.

 मदत करणे हा उद्देश ठेवा – महेश लांडगे

भाजप शहराध्यक्ष आमदार महेश लांडगे म्हणाले, ”देशावरील हे संकट मोठे आहे. यामध्ये कोणीही राजकारण करु नये. कोण कुठे मदत करतो. यापेक्षा मदत करणे हा प्रामुख्याने सर्वांनी उद्देश ठेवावा. हे संकट कोणत्या एका राजकीय पक्षाचे नाही. त्यामुळे सर्वांनी एकी दाखवावी”.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.