Pimpri Chinchwad : स्मशानभूमीतील शौचालय दोन वर्षांपासून बंद

एमपीसी न्यूज – स्वच्छ सर्वेक्षणावर लाखोंची उधळपट्टी करणाऱ्या पिंपरी-चिंचवड (Pimpri Chinchwad) महापालिकेच्या निगडी स्मशानभूमीतील शौचालय तब्बल दोन वर्षांपासून बंद आहे. प्रशासनाच्या वतीने नवीन शौचालय बांधण्याच्या कामास सुरुवात करण्यात आली. परंतु, या कामास पाच महिन्यांचा कालावधी उलटून देखील पालिकेने नेमलेल्या ठेकेदाराकडून अद्यापही काम पूर्ण करण्यात आलेले नाही. अत्यंत संथ गतीने चाललेल्या शौचालयाच्या बांधकामामुळे तेथे अंत्यविधीसाठी येणाऱ्या नागरिकांना गैरसोयींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे शौचालयाचे काम तात्काळ सुरू करण्यात यावे, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते दिपक खैरनार यांनी केली आहे.

या संदर्भात आयुक्तांना दिलेल्या तक्रार अर्जात खैरनार यांनी म्हटले आहे की, निगडी अमरधाम स्मशानभूमीमधील सार्वजनिक शौचालयाला बांधून तब्बल तीस वर्षे झालेली आहेत. हे शौचालय अत्यंत जीर्ण झाले असून त्यातील भिंतींना मोठ-मोठे तडे गेल्याने शौचालय कोणत्याही क्षणी ढासळण्याची शक्यता नाकारता येत नाही. या संदर्भात अनेक वेळा तक्रारी केल्यानंतर पाच महिन्यापूर्वी प्रशासनाकडून नवीन शौचालय बांधण्याच्या कामास सुरुवात करण्यात आली. परंतु, अद्यापपर्यंत या शौचालयाचे काम पूर्ण करण्यात आलेले नाही. केवळ तीनशे स्क्वेअर फुट इतक्या जागेत चालू असणा-या शौचालयाचे काम एवढ्या कालावधीत पूर्ण व्हायला हवे होते. परंतु, आत्तापर्यंत फक्त शौचालयाच्या पायापर्यंतचे (प्लिंथ लेव्हल) काम झाले आहे. त्यामुळे काम हे अत्यंत धीम्या गतीने चालू असल्याचे दिसून येत आहे.

Kartiki Yatra : आळंदीमध्ये श्रीगुरु हैबतबाबांच्या पायरी पूजनाने कार्तिकी यात्रेला सुरुवात

पालिकेकडून स्वच्छ सर्वेक्षणाच्या नावाखाली शहरभर फक्त (Pimpri Chinchwad) जाहिराती व रंगरंगोटीवर वारेमाप पैसा खर्च केला जातो. त्यामुळे स्वच्छ सर्वेक्षणावर लाखोंची उधळपट्टी करणाऱ्या पिंपरी महापालिकेचा कारभार म्हणजे ‘दिव्या खाली अंधार’ असाच आहे. स्मशानभूमीत अंत्यविधीसाठी येणारे वृद्ध नागरिक, दिव्यांग व्यक्ती, महिला वर्ग, तसेच नागरिकांना यामुळे मोठ्या अडचणीचा सामना करावा लागत आहे. परंतु, याचे गांभीर्य लोकप्रतिनिधी, संबंधित अधिकारीवर्ग तसेच ठेकेदाराला नसल्याचे दिसून येत आहे. प्रशासनाकडे या संदर्भात अनेक वेळा तक्रारी करून देखील ठेकेदार त्याच्या सोयीनुसार हे काम करीत आहे.

ठेकेदारावर प्रशासनाचा वचक राहिलेला नाही. त्यामुळे स्वतः आयुक्तांनी यात लक्ष घालून शौचालयाचे काम तात्काळ पुर्ण करण्या संदर्भात संबंधित यंत्रणेला आदेश द्यावेत, अन्यथा नाईलाजास्तव तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशाराही खैरनार यांनी दिला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.