Pimpri : महापालिकेच्या एचसीएमटीआर मार्किंगला कासारवाडीमधील नागरीकांचा विरोध

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने कासारवाडी-दापोडी येथे रस्त्याच्या मार्किंगला सुरुवात करण्यात आली आहे. कासारवाडी व बोपोडी येथील एचसीएमटीआर संदर्भातील अनेक प्रकरणे न्यायालयात न्यायप्रविष्ट असताना महापालिकेने अचानक घाईगडबडीने हे काम सुरू केले आहे. त्यामुळे बोपोडी आणि कासारवाडी येथील स्थानिक नागरिकांनी या कामाला विरोध केला.

घर बचाव संघर्ष समितीच्या वतीने कोपरा सभा घेण्यात आली. या सभेत नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद नोंदवला. तसेच महापालिकेच्या या बेकायदेशीर भूमिकेचा नागरिकांनी निषेध व्यक्त केला. यावेळी मुख्य समन्वयक विजय पाटील, समन्वयक प्रदीप पवार, निलचंद्र निकम, गौशिया शेख, सचिन पोखरकर, नंदकुमार नायकौडी आदी उपस्थित होते.

विजय पाटील म्हणाले, कासारवाडी व पिंपळे गुरव परिसरातील शेकडो घरे महापालिकेच्या नियमानुसार अनधिकृतरित्या बांधली आहेत. या घरांमध्ये मागील 40 वर्षांपासून नागरिक राहत आहेत. या रहिवाशांची घरे रिंगरोडमध्ये जाणार आहेत. ती घरे वाचवण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. तिची सुनावणी देखील सुरु आहे. रिंगरोड बाधित नागरिकांच्या जमिनींबाबतचे प्रकरण न्यायालयात असताना पालिका प्रशासनाने त्याच जागेत घुसून काम सुरु करणे ही पालिका प्रशासनाची शुद्ध दादागिरी आहे.

कोणाच्यातरी इशाऱ्यावरून घाई गडबडीत रस्त्याचे काम सुरू करणे, हे न्यायव्यवस्थेचे उल्लंघन आहे. मागील 800 दिवसांपासून ‘घर बचाव संघर्ष समितीच्या’ माध्यमातून बाधित हक्काच्या घरांसाठी आंदोलन सुरु आहे. नियमांचे पालन न करता एचसीएमटीआर आरेखीत रस्त्याचे मार्किंग व मोजमाप करण्याचे काम शुक्रवारी करण्यात आले. या कामाला नागरिकांनी विरोध दर्शवत नागरिकांनी कोपरा सभा घेतली, असेही पाटील म्हणाले.

या सभेचे नियोजन सामाजिक कार्यकर्ते अमरसिंग आदियाल, विजय येवले, मोहिनुद्दीन शेख, कासीमअली शेख, हिराबाई येवले, लक्ष्मी सूर्यवंशी, प्रमिला सोनकांबळे, रावसाहेब देवकाते, प्रवीण चपटे, बाप्पा मोरे, नागेश धर्माधिकारी, शशिकांत आरेकर, जनार्दन पवार, अशोक सावंत, नितीन रोकडे, संजय गायकवाड, प्रसाद काणेकर, कृष्णा फागे, शुभम लहाडे, सविता मदने, फातिमा शेख, शुभद्रा पवार, यास्मिन शेख, सुवर्णा कुलकर्णी, संगीता मोरे, शांताबाई साळवे यांनी केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.