Pimpri : कोरोना; रुग्णांची सेवा करणाऱ्या डॉक्टर्स, नर्स आणि आरोग्य कर्मचाऱ्यांचे आरोग्यमंत्र्यांनी मानले आभार

एमपीसी न्यूज – कोरोनाचे जगभरात थैमान सुरू असताना मार्चच्या पहिल्या आठवड्यात या विषाणूचा राज्यात शिरकाव झाला आणि तेव्हापासून वैद्यकीय कर्मचारी जीवाची पर्वा न करता रुग्णांची सेवा करत आहेत. त्यांच्या या कार्यामुळे व तत्पर सेवा आणि अविरत मेहनतीमुळे आतापर्यंत राज्यातील 39 कोरोना रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. यात डाॅक्टर व नर्स यांचा सिंहाचा वाटा आहे. त्याबद्दल त्यांचे अभिनंदन करीत आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी आभार मानले आहेत.

मंत्री टोपे यांनी एक पत्राद्वारे हे आभार व्यक्त केले आहे. डाॅक्टर व नर्स आणि आरोग्य कर्मचाऱ्यांना लिहिलेल्या पत्रात ते म्हणतात, कोरोनाचा शिरकाव सुरू झाल्यापासून आपण सर्वप्रथम त्याला सामोरे गेला आहात. सर्वात आधी तुम्ही मंडळीनी या युद्धाला सामारे जाण्यासाठी नेतृत्व केलं. त्याचप्रमाणे एखाद्या लढाईत आघाडीवरचा सैनिक झोकून देऊन नेटाने लढत असतो तसे तुम्ही आतापर्यंत धीराने कोरोना विरुद्ध लढा देत आहात. समाजाच्या सेवेसाठी हे अतुलनीय शीर्य तुम्ही गेल्या कित्येक दिवसापासून न धकता करत आहात. हे अभिनंदनीय आहे.

तुम्ही दाखवत असलेल्या धीरामुळे रुग्णांना तर मानसिक बळ मिळते. परंतु, आम्हालाही त्यामुळे काम करण्याचे पाठबळ व प्रोत्साहन मिळत आहे. समस्त देशवासीय आपापल्या घरात कुटुंबियांसमवेत असताना आपण मात्र कर्तव्य भावनेतून कुटुंबापासून, आप्तस्वकीयांपासून दूर जात सेवाभाव जपत आहात. खरं तर आपलं कौतुक करायला माझ्याकडे शब्द अपुरे पडत आहेत.

पुन्हा मी आपणा सर्वाना त्रिवार मानाचा मुजरा करतो, कोरोनाला हरविण्यासाठी आपली लढाई अशीच सुरू ठेवू या. ‘मीच माझा रक्षक’ हा संदेश आपण सर्वसामान्यांना दिला आहे. आपणही आपल्या प्रकृतीची काळजी घ्या. अशा पद्धतीने आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी डॉक्टर्स, नर्स आणि आरोग्य कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले व करत असलेल्या सेवेबद्दल मंत्री टोपे यांनी त्यांचे आभार मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.