Pimpri Corona Update : प्रभागनिहाय रुग्ण संख्येत होतेय घट; ‘ब’ प्रभागात सर्वाधिक रुग्ण, आपल्या भागात किती ॲक्टीव्ह रुग्ण ?

एमपीसी न्यूज – मागील पंधरा दिवसांपासून पिंपरी-चिंचवड शहरातील कोरोनाची रुग्णसंख्या घटत आहे. नवीन रुग्णापेक्षा बरे झालेल्या रुग्णांची संख्या जास्त आहे. त्यामुळे प्रभागातील सक्रिय रुग्णांचा आलेखही खाली आला आहे. ही दिलासायक बाब मानली जात आहे. पालिकेच्या ‘ब’ प्रभाग कार्यालय हद्दीतील रावेत, किवळे-विकासनगर, बिजलीनगर, चिंचवडेनगर, चिंचवड परिसरात कोरोनाचे सर्वाधिक म्हणजेच 767 सक्रिय रुग्ण आहेत. तर, ‘ह’ क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत येत असलेल्या संत तुकारामनगर, महात्माफुलेनगर, दापोडी, फुगेवाडी, कासारवाडी, नवी सांगवी, सांगवी भागात सर्वात कमी म्हणजेच कोरोनाचे 301 रुग्ण आहेत.

महापालिकेने शुक्रवारी (दि.9) रात्री दिलेल्या नकाशानुसारची ही आकडेवारी आहे. शहरातील 3 हजार 689 सक्रिय रुग्णांवर पालिका रुग्णालय, सीसीसी सेंटरमध्ये उपचार सुरु आहेत. काही रुग्णांवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. शहरातील रुग्णसंख्या 85 हजाराच्या उंबरठ्यावर आहे.

शहरात 10 मार्च रोजी कोरोनाचा पहिला रुग्ण आढळला होता. तेव्हापासून शहरातील 82 हजार 993 जणांना कालपर्यंत कोरोनाची लागण झाली आहे. त्यापैकी 77 हजार 237 जणांनी कोरोनाविरोधातील लढाई जिंकली आहे.

तर, खासगी रुग्णालये, होम आयसोलेशन यामध्ये एकूण 5 हजार 756 सक्रिय रूग्णांवर उपचार सुरू आहेत. शहरातील 1412 जणांचा तर शहराबाहेरील परंतू महापालिका रूग्णालयात उपचार घेणार्‍या 545 अशा 1957 जणांचा कालपर्यंत कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

महापालिकेकडून शहरात कोरोनाचे किती सक्रिय रुग्ण आहेत त्याबाबतची सविस्तर माहिती असलेला क्षेत्रीय कार्यालनिहाय नकाशा दररोज प्रसिद्ध केला जातो. शुक्रवारी रात्री प्रसिध्द केलेल्या नकाशानुसार ‘ब’ क्षेत्रीय प्रभाग कार्यालयाच्या हद्दीतील रावेत, किवळे-विकासनगर, बिजलीनगर, चिंचवडेनगर या भागात कोरोनाचे सर्वाधिक 767 सक्रिय रुग्ण आहेत.

क्षेत्रीय कार्यालयानिहाय सक्रिय रुग्ण संख्या !

‘अ’ – क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत येत असलेल्या संभाजीनगर, मोहननगर, आनंदनगर, चिंचवडस्टेशन, आकुर्डी, प्राधिकरण, आनंदनगर, भाटनगर भागात 322 सक्रिय रुग्ण आहेत.

‘ब’ – क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत येत असलेल्या रावेत, किवळे-विकासनगर, बिजलीनगर, चिंचवडेनगर, चिंचवड प्रभागात सर्वाधिक म्हणजेच 767 सक्रिय रुग्ण आहेत.

‘क’ – क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत येत असलेल्या नेहरूनगर, खराळवाडी, अजमेरा, बोऱ्हाडेवाडी, धावडेवस्ती, इंद्रायणीनगर भागात कोरोनाचे 412 रुग्ण आहेत.

‘ड’ – क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत येत असलेल्या वाकड, पिंपळेनिलख, पिंपळेसौदागर, पिंपळेगुरव भागात कोरोनाचे 386 सक्रिय रुग्ण आहेत.

‘इ’ – क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत येत असलेल्या भोसरी, गवळीनगर, चऱ्होली, दिघी भागात 650 रुग्ण आहेत. च-होली, दिघी भागातील रुग्णांची संख्या जास्त आहे. प्रभागातील रुग्णसंख्या तीन हजाराच्या पुढे गेली होती. आता नियंत्रणात आली आहे.

‘फ’ – क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत येत असलेल्या चिखली, कृष्णानगर, तळवडे-रुपीनगर, यमुनागनर, निगडी गावठाण, सेक्टर क्रमांक 22 या प्रभागात कोरोनाचे 448 रुग्ण आहेत.

‘ग’ – क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत येत असलेल्या पिंपरीगाव, थेरगाव, गणेशनगर, रहाटणी भागात कोरोनाचे 403 सक्रिय रुग्ण आहेत.

‘ह’ – क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत येत असलेल्या संत तुकारामनगर, महात्माफुलेनगर, दापोडी, फुगेवाडी, कासारवाडी, नवी सांगवी, सांगवी भागात सर्वात कमी म्हणजेच कोरोनाचे 301 सक्रिय रुग्ण आहेत.

एकूण 3689 सक्रिय रुग्णांवर कोविड केअर सेंटर, महापालिका, खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.