Pimpri : ‘प्रधानमंत्री आवास’चे अर्ज भरण्यासाठी मुदतवाढ देण्याची मागणी

प्रधानमंत्री आवास योजनेसाठी अर्ज करण्यासाठी 30 ऑक्टोबर 2020 पर्यंत मुदतवाढ द्यावी. ई मेलची सक्ती नसावी. एक हजार रुपयांचे नाममात्र शुल्क घ्यावे.

एमपीसी न्यूज – प्रधानमंत्री आवास योजनेचे अर्ज भरण्यासाठी सर्वसामान्य नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लगत आहे. नागरिकांच्या अडचणी समजून घेत महापालिका प्रशासनाने अर्ज भरण्यासाठी एक महिन्याची मुदतवाढ द्यावी, अशी मागणी डेमोक्रॅटिक यूथ फेडरेशन ऑफ इंडिया (डीवायएफआय) आणि अखिल भारतीय जनवादी महिला संघटना पिंपरी चिंचवड शहर समिती यांच्या वतीने महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याकडे करण्यात आली आहे.

संघटनेच्या वतीने आयुक्तांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, प्रधानमंत्री आवास योजनेसाठी अर्ज भरण्यासाठी ऑनलाइन सुविधा केंद्राची कमतरता आहे. वैयक्तिक लॅपटॉप सर्वसामान्य लोकांकडे नाहीत. मोबाईलवर अर्ज भरणे तांत्रिकदृष्ट्या अडचणीचे होत आहे.

अनेकांकडे ई-मेल नाहीत. कुटुंब सदस्यांचे आधार कार्ड नाहीत, शहरातील नागरी सुविधा केंद्रावर आधीच विद्यार्थी आणि अन्य नागरिकांच्या दाखल्यासाठी प्रचंड गर्दी आहे.

ज्या गरीब नागरिकांसाठी ही योजना आहे, ते नागरिक संगणक साक्षर नाहीत. अनेक संभाव्य लाभार्थी लॉकडाउन असल्याने बाहेरगावी आहेत. जे नागरिक शहरात आहेत ते सध्या बारा-बारा तास काम करत आहेत. या सर्व अडचणी प्रशासनाने लक्षात घ्याव्यात.

त्यामुळे प्रधानमंत्री आवास योजनेसाठी अर्ज करण्यासाठी 30 ऑक्टोबर 2020 पर्यंत मुदतवाढ द्यावी. ई मेलची सक्ती नसावी. एक हजार रुपयांचे नाममात्र शुल्क घ्यावे.

उपलब्ध कागदपत्रे स्वीकारून अन्य आवश्यक कागपत्रासाठी एक महिन्याची मुदत वाढ द्यावी. अत्यावश्यक सर्व दाखले सोडतीच्या वेळी घ्यावेत. सर्वसामान्य नागरिकांना बँक कर्ज देत नाही. त्यामुळे घरे बांधण्याचा खर्च ताबा घेण्यापूर्वी वसूल करू नये.

घरांचा ताबा द्यायच्या आधी सरकारने बँक हमी घेऊन गृहकर्ज प्रकरणे मंजूर करून द्यावीत, असेही निवेदनात म्हटले आहे.

अपर्णा दराडे, सचिन देसाई, स्वप्नील जेवळे, अमिन शेख, संतोष गायकवाड, सोनाली शिंदे, मंगल डोळस, शेहनाज शेख, वैशाली थोरात, ज्योती मूलमूले, सतीश मालुसरे, अविनाश लाटकर, किसन शेवते, सतीश मालुसरे, विनोद चव्हाण यांनी आयुक्तांकडे ही मागणी केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.