Pimpri: शहरासाठी पीएमपीएमएलच्या ताफ्यात 50 ई-बस दाखल

एमपीसी न्यूज – पुणे महानगर परिवहन महामंडळ (पीएमपीएमएल)च्या ताफ्यात एकूण 120 ई-बस दाखल झाल्या आहेत. त्यापैकी 50 बस पिंपरी-चिंचवड शहरासाठी उपलब्ध करुन दिल्या आहेत. या सर्व बस बीआरटी मार्गाकरिता वापरल्या जाणार आहेत. काळेवाडी ते देहू-आळंदी रस्ता या मार्गावर या बसेस धावण्याची शक्‍यता आहे. निगडीतील बस टर्मिनलमध्ये बसचे चार्जिंग केले जात आहे.

पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या मागणीनुसार 120 ई-बस उपलब्ध करुन दिल्या आहेत. त्याकरिता पुणे महापालिकेचा 60 टक्के तर पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या 40 टक्के हिस्सा यानुसार या बसची विभागणी करण्यात आली आहे. त्यानुसार पुण्याच्या वाट्याला 70 तर, पिंपरीच्या वाट्याला 50 बस आल्या आहेत.

  • या सर्व बस वातानुकुलीत असून, नेहमीच्या मार्गांवर धावणा-या बस तिकीटाच्या दरातच या बसमधून प्रवास करता येणार आहे. यापुर्वीच निगडी-भोसरी मार्गावर या बस धावत असून, त्यांना प्रवाशांना चांगला प्रतिसाद मिळत आहे. तीन तासांच्या चार्जिंगनंतर ही बस 150 ते 200 किलोमीटर अंतर पार करु शकते.

आणखी चार्जिंग पॉईंट उपलब्ध करणार
या बस 12 मीटर लांबीच्या असून, भक्‍ती-शक्‍ती बस टर्मिनलमध्ये चार्जिंगकरिता पाच पॉईंट उपलब्ध आहेत. त्यामुळे दिवसभरात एकूण 40 बस चार्जिंग करता येणार आहेत. हे चार्जिंग पॉईंट कमी पडत असल्याने, याचठिकाणी आणखी नवीन चार्जिंग पॉईंट निर्माण केले जाणार आहेत. त्याकरिता महावितरणकडून इस्टिमेट मागविण्यात आले आहे. याशिवाय पीएमपीएमएलच्या भेकराईनगरमध्येदेखील चार्जिंग पॉईंट उपलब्ध आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.