Pimpri: ‘कोरोना’बाधित रुग्णांवरील उपचारासाठी खासगी रुग्णालय अधिगृहित करा -इरफान सय्यद

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्यामुळे महापालिका हद्दीतील सर्व खासगी मोठी रुग्णालये अधिग्रहित करावीत. या रुग्णालयांमध्ये विलगीकरण कक्षाची स्थापना करावी, अशी मागणी शिवसेना प्रणित महाराष्ट्र मजदूर संघटनेचे अध्यक्ष, भारतीय कामगार सेना महासंघाचे उपाध्यक्ष, खेड-आळंदी, भोसरी विधानसभा मतदारसंघाचे सहसंपर्क प्रमुख इरफान सय्यद यांनी केली आहे.

याबाबत पुण्याचे जिल्हाधिकारी नवलकिशोर राम, महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांना निवेदन दिले आहे. त्यात सय्यद यांनी म्हटले आहे की, राज्यात सर्वाधिक कोरोनाचे रुग्ण आहेत. त्यामध्ये मुंबई, पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये सर्वाधिक कोरोनाचे रुग्ण आहेत. शहरात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढतच आहे. पुण्यात कोरोनाचे 350 रुग्ण सापडले आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीत देखील 47 रुग्ण सापडले आहेत. खबरदारी म्हणून शहरातील अनेक भाग सील केले आहेत. शहरातील अनेक रुग्णांची तपासणी करण्यात येत आहे. रुग्ण संख्येत वाढ होण्याची भीती आहे. त्यासाठी तत्काळ अधिक उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे.

कोरोनाच्या पार्श्वभुमीवर पुणे जिल्ह्यात आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू करण्यात आला आहे. त्यामुळे आपत्तीजन्न परिस्थितीत खासगी रुग्णालय, डॉक्टर, यंत्रसामुग्री अधिगृहित करता येणार आहे. शहरात नामांकित 10 रुग्णालये आहेत. त्यांची खाटांची संख्या 100 च्या आसपास आहे. शहरातील रुग्णांची वाढती रुग्ण संख्या लक्षात घेता आणि भविष्यातील उपचाराचा विचारा करावा. महापालिका रुग्णालयाची क्षमता, रुग्ण संख्येची वाढ विचारात घेता खासगी रुग्णालयांची आवश्यकता भासणार आहे.

वायसीएममध्ये जागेची कमतरता आहे. त्याबाबत तक्रारी आरोग्यमंत्र्यांकडे गेल्या आहेत. त्यामुळे महापालिकेच्या आरोग्य सुविधेवरील ताण कमी करण्यासाठी शहरातील नामांकित रुग्णालये अधिग्रहित करावीत. जेणेकरुन आजाराच्या संकटाशी सामना करण्याची पूर्वतयारी म्हणून वैद्यकीय उपचार उपाययोजना शहरात तयार असेल, असेही सय्यद यांनी निवेदनात म्हटले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.