Pimpri: राज्यात पॉझिटीव्ह आलेला पहिला पोलीस ‘कोरोनामुक्त’

एमपीसी न्यूज – पोलीस दलासाठी आनंदाची बातमी आहे. राज्यातील पॉझिटीव्ह आलेला पहिला पोलीस कर्मचारी आणि त्यांची पत्नी आज (शनिवारी) कोरोनामुक्त झाले आहेत. पिंपरी महापालिकेच्या रुग्णालयात उपचार घेऊन ते ठणठणीत झाले असून त्यांना आज घरी सोडण्यात आले आहे. दरम्यान, सर्व नागरिकांनी सरकारच्या सूचनांचे पालन करुन स्वत:ची काळजी घ्यावी, असा सल्ला कोरोनामुक्त झालेल्या पोलीस कर्मचा-यांने दिला आहे.

पिंपरी-चिंचवड शहराच्या च-होली भागात  वास्तव्यास असलेले आणि  पुण्यातील एका मध्यवर्ती पोलीस ठाण्यात कार्यरत  असलेल्या 42 वर्षीय कॉन्स्टेबलला 17 एप्रिल रोजी कोरोनाची लागण झाली होती. त्यांच्या पत्नीलाही कोरोनाची लागण झाली होती. राज्यातील पोलीस दलातील पॉझिटीव्ह आलेले ते पहिले कर्मचारी होते. त्यामुळे पोलीस दलात खळबळ उडाली होती. दरम्यानच्या काळात पुणे शहरातील आठ ते नऊ पोलिसांना कोरोनाची लागण झाली आहे. राज्यातीलही काही भागातील पोलिसांना कोरोनाची बाधा झाली आहे. आपल्या जीवाची पर्वा न करता जनतेची सुरक्षा करणा-या पोलिसाला कोरोनाची लागण झाल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.

या पोलिसावर आणि त्यांच्या पत्नीवर पिंपरी महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयात उपचार सुरु होते. त्यांची प्रकृती अतिशय गंभीर होती. परंतु, त्यांच्यावर योग्य उपचार झाले. 14 दिवसाच्या उपचारानंतर पती-पत्नीचे नमुने एनआयव्हीकडे तपासणीसाठी पाठविले होते. दोघांचेही 14 दिवसांचे आणि त्यानंतरच्या 24 तासाचेही रिपोर्ट निगेटीव्ह आले आहेत. त्यामुळे दोघेही कोरोनामुक्त होत ठणठणीत झाले आहेत. त्यांना आज घरी सोडण्यात आले आहे. यामुळे पोलीस दलात आनंदाचे वातावरण आहे. त्यांच्या गृहनिर्माण सोसायटीतील नागरिकांनी त्यांचे टाळ्या वाजवून स्वागत केले. नगरसेविका विनया तापकीर, प्रदीप तापकीर यावेळी उपस्थित होते. सर्वांनी सोशल डिस्टन्सिंगचे पालन केले. तर, शहरातील आजपर्यंत 44 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.

याबाबत ‘एमपीसी न्यूज’शी बोलताना कोरोनामुक्त झालेले पोलीस कर्मचारी म्हणाले, ” पिंपरी महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयात माझ्यावर अतिशय योग्य उपचार झाले. चांगली काळजी घेतली. खासकरुन डॉ. विनायक पाटील यांनी माझी खूप काळजी घेतली. माझी प्रकृती खूप ‘क्रिटिकल’ होती. वायसीएम रुग्णालयातील डॉक्टरांपासून ते साफसफाई कर्मचा-यांबाबत बोलण्यासाठी माझ्याकडे शब्द नाहीत.  मी त्यांचा मनापासून ऋणी आहे. प्रत्येकाने आपली स्वत:ची काळजी घ्यावी. हात धुवावेत, सोशल डिस्टनिंगचे पालन करावे. सरकारच्या नियमांचे सर्वांनी पालन करावे असे आवाहनही त्यांनी केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.