Pimpri : श्रीमोरया गोसावी समाधी मंदिरावर पुष्पवृष्टी आणि महाप्रसादाने संजीवन समाधी सोहळ्याची सांगता

एमपीसी न्यूज – चिंचवड देवस्थान ट्रस्ट, पिंपरी-चिंचवड महापालिका आणि ग्रामस्थांच्या वतीने आयोजित 458 व्या श्रीमन महासाधू श्री मोरया गोसावी संजीवन समाधी सोहळा मंगळवारी (दि. 17) पार पडला. श्रीमोरया गोसावी समाधी मंदिरावर पुष्पवृष्टी, काल्याचे कीर्तन आणि महाप्रसादाने या संजीवन समाधी सोहळ्याची सांगता झाली.

शनिवार (दि. 7) ते मंगळवार (दि. 17) या कालावधीत श्री मोरया गोसावी संजीवन समाधी सोहळा देऊळमळा पटांगणावर झाला. या सोहळ्यात पंढरपूर येथील सिद्ध सदगुरु योगी श्री शांतीनाथ महाराज यांचा ‘श्री मोरया जीवन गौरव’ पुरस्काराने गौरव करण्यात आला. त्याचबरोबर विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या अन्य बारा जणांना मोरया पुरस्काराने गौरविण्यात आले.

मंगळवारी पहाटे चिंचवड देवस्थान ट्रस्टचे मुख्य विश्वस्त मंदार महाराज देव आणि चिंचवड ब्रह्मवृंद यांच्या हस्ते श्रीमोरया गोसावी समाधीची महापूजा व अभिषेक करण्यात आला. सकाळी सात वाजता दिंडी काढण्यात आली. श्रीमोरया गोसावी समाधी मंदिरावर पुष्पवृष्टी करण्यात आली. पुष्पवृष्टी झाल्यानंतर स्थानिक पुरुष, महिला आणि विद्यार्थ्यांनी श्रीमोरया गोसावी चरित्र पठण केले. आळंदी देवाची येथील हभप आसाराम महाराज बढे यांचे काल्याचे कीर्तन झाले. कीर्तन झाल्यानंतर पारंपरिक पद्धतीचा महाप्रसाद वाटप करण्यात आला. सुमारे पाच हजार मोरया भक्तांनी महाप्रसादाचा लाभ घेतला.

7 ते 17 डिसेंबरच्या कालावधीत विविध कार्यक्रम घेण्यात आले. यामध्ये श्री मोरया गोसावी चरित्र पठण, भजन, योगासन, कीर्तन, सुगम, शास्त्रीय संगीत, प्रवचन, नाट्यगीत, अभंगवाणी, अथर्वशीर्ष पठण, महापूजा, सामुदायिक महाभिषेक, रक्तदान शिबिर, दंत चिकित्सा शिबीर, नेत्र चिकित्सा व मोफत चष्मे वाटप यांचा समावेश होता.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.