Pimpri-परराज्यातून व जिल्ह्यातून पिंपरी-चिंचवड शहरात येणाऱ्या नागरिकांसाठी पालिकेकडून मार्गदर्शक सूचना

Pimpri: Guidelines from Pimpri-Chinchwad Municipal Corporation for migrants

एमपीसी न्यूज – कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी संपूर्ण देशभरात लॉकडाउन जाहीर करण्यात आला आहे. या कालावधीत सर्व प्रकारची शासकीय, खाजगी प्रवासी वाहतूक बंद करण्यात आली आहे. मात्र महाराष्ट्र शासनाच्या आदेशानुसार परराज्यात आणि जिल्ह्यात अडकलेले विस्थापित कामगार, पर्यटक, विद्यार्थी, भाविक आणि इतर नागरिकांना जिल्ह्यात येण्यासाठी तसेच जिल्ह्यातून बाहेर जाण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे.

परराज्यातून व जिल्ह्यातून पिंपरी-चिंचवड शहरात येणाऱ्या विस्थापित कामगार, पर्यटक, विद्यार्थी, भाविक आणि इतर नागरिकांना पिंपरी-चिंचवड महापालिकेकडून खालील सुचना देण्यात आल्या आहेत –

# शहरात आलेल्या व्यक्तींची वैद्यकीय तपासणी करून त्या व्यक्तींना आवश्‍यकतेप्रमाणे गृह विलगीकरण अथवा संस्थात्मक विलगिकरणाचा सल्ला दिला जाईल.

# शहराच्या प्रवेशाच्या ठिकाणी पोलीस, महसूल व वैद्यकीय अधिकारी यांच्यामार्फत थर्मल गन आणि इतर  अनुषंगिक तपासणी करुन गृह विलगीकरण, संस्थात्मक विलगीकरण याचा शिक्का मारण्यात येईल. नागरिकांनी गृह विलगीकरणाचे उल्लंघन केल्यास उल्लंघनाच्या दिवसापासून पुढे 14 दिवस त्यांचे संस्थात्मक विलगीकरण केले जाईल.

# इतर राज्यातून शहरात येणाऱ्या रहिवाशांच्या बाबतीत त्या राज्यातून संबंधित अधिकारी यांच्याकडून यादी, वैद्यकीय प्रमाणपत्र, मार्गक्रमण योजना, आराखडा, वाहनाची परवानगी, प्रवासाचा कालावधी व त्या वाहनात परवानगी असलेलेच व्यक्ती त्या वाहनात असल्याची खात्री केली जाईल.

# परवानगी न मिळालेल्या व्यक्ती आढळून आल्यास पूर्ण वाहनांची वेगळ्याने छाननी, तपासणी करून त्या व्यक्तींचे विलगीकरण केले जाईल.

# राज्यांतर्गत व इतर राज्यातून येणाऱ्या व्यक्तींनी आणि रेड झोनमध्ये मुक्काम केला आहे का, याची खात्री केली जाईल.

# प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे उल्लंघन केल्यास संबंधित नागरिकांवर भारतीय दंड विधान कलम 188 अन्वये कारवाई करण्यात येईल.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.