Pimpri : अजित पवार यांच्यासोबत आता फक्त आण्णा बनसोडे ?

बाकी आमदार हॉटेल हयातमध्ये दाखल

एमपीसी न्यूज – राष्ट्रवादी काँग्रेसच्या दहा ते बारा आमदारांना घेऊन बंडखोरी करत भाजपसोबत सरकार स्थापन करणारे अजित पवार यांना धक्का बसला आहे.  शपथविधीला पवार यांच्यासोबत असणारे आमदार पक्षाकडे परतले आहेत. त्यापैकी केवळ पिंपरीचे आमदार अण्णा बनसोडे हे एकमेव पवार यांच्यासोबत आहेत. त्यामुळे पवार हे एकटे पडल्याचे दिसत आहे. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांकडून अद्यापही अजित पवार यांची मनधरणी केली जात आहे.

राष्ट्रवादीचे विधीमंडळ नेते अजित पवार यांनी बंडखोरी करत शनिवारी (दि.23) भल्या पहाटे भाजपसोबत सरकार स्थापन केले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासबोत उपमुख्यमंत्रीपदाची अजित पवार यांनी शपथ घेतली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे दहा ते बारा आमदार अजित पवार यांच्यासोबत होते. परंतु, अजित पवारांच्या निर्णयाला पाठिंबा नसल्याचे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी स्पष्ट केले आहे.

त्यामुळे राष्ट्रवादीचे आमदार पुन्हा पक्षाकडे आले. तर, तीन आमदार दिल्लीमध्ये होते. ते देखील आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांना एकत्रित ठेवलेल्या हॉटेलमध्ये आले आहेत. आता केवळ अण्णा बनसोडे आले नाहीत. त्यामुळे केवळ एकमेव बनसोडे हे अजित पवार यांच्यासोबत राहिले असल्याचे स्पष्ट होत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.