Pimpri: पिंपळेगुरवमध्ये रविवारी रंगणार खान्देश सांस्कृतिक महोत्सव

एमपीसी न्यूज – खान्देशातून उद्योग, व्यवसाय निमित्त पिंपरी, चिंचवड व पुणे शहरात स्थायिक झालेल्या बंधू, भगिनींनी एकत्रित येऊन खान्देश संस्कृतीचे जतन व संवर्धन करण्याच्या उद्देशाने खान्देश सांस्कृतिक महोत्सवाचे’ आयोजन केले आहे. याबाबतची महोत्सवाचे कार्याध्यक्ष पि. के. महाजन यांनी दिली आहे.

पिंपळेगुरव येथील नटसम्राट निळू फूले रंगमंदिरात रविवारी (दि. 14) सकाळी 11 वाजता खान्देश अहिराणी कस्तुरी साहित्य, सांस्कृतिक, कला, क्रीडा मंच पुणे या संस्थेने आयोजित केलेल्या महोत्सवाचे उद्‌घाटन पंडीत ह्रदयनाथ मंगेशकर यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी महापौर राहुल जाधव, अकोल्याचे महापौर विजय आगरवाल, आमदार लक्ष्मण जगताप, महेश लांडगे, गौतम चाबुकस्वार, ज्येष्ठ साहित्यिक व गीतकार ना. धों. महानोर, ज्येष्ठ पत्रकार अजित चव्हाण, ज्येष्ठ पार्श्वगायिका उषा मंगेशकर, उपमहापौर सचिन चिंचवडे, माजी आमदार विलास लांडे, ज्येष्ठ नगरसेवक भाऊसाहेब भोईर, नामदेव ढाके, रोहित काटे, शत्रुघ्न काटे, नगरसेविका माई ढोरे, स्वाती काटे, चंद्रकांता सोनकांबळे, ज्येष्ठ उद्योजक अशोक थोरात, स्वागताध्यक्ष प्रशांत निकम, निमंत्रक विजया मानमोडे आदी उपस्थित राहणार आहेत.

तत्पूर्वी सकाळी 9 वाजता नवी सांगवीतील डायनासोर गार्डन पासून नटसम्राट निळू फुले रंगमंदिरापर्यंत सांस्कृतिक शोभायात्रा काढण्यात येणार आहे. या महोत्सवात पंडीत ह्रदयनाथ मंगेशकर (अखिल भारतीय खान्देश कोहिनुर), डॉ. उषा सावंत (जीवन गौरव), अजित चव्हाण (अखिल भारतीय खान्देश भूषण), तसेच अशोक थोरात, रवींद्र शेलार, भगवान गवळी, लेफ्ट. डॉ. जितेंद्र देसले, विजय पवार, विद्या भाटीया, गितांजली कोळी, कैलास बोरसे, ऋचा बिरारी, चैताली भोईर, राजेंद्र वाघ, पुंडलीक सैंदाणे, राजेंद्र रौंदळ यांना ‘खान्देश रत्न’ पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे.

दुपारी 1 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत पारंपरिक भिलाऊ नृत्य, तीन पावली, बारा पावली, कानबाई गौराई गीते, अहिराणी भारुड, गाणी, लोकगीते, लोकनृत्य, छक्कड, पोवाडा, बायजाबाईन सोंग, किल्लनी भाजी कयनानी भाकर, पपेट शो, लगीन गीते, बतावणी अशा खान्देशी संस्कृतीचे सादरीकरण करण्यात येणार आहे.

महोत्सवाचे मुख्य आकर्षण सायंकाळी साडेपाच वाजता ज्येष्ठ संगीतकार पंडीत ह्रदयनाथ मंगेशकर यांची ‘आजोळची गाणी’ हा सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहे. महोत्सवाचे संयोजन पंकज निकम, शरद पाटील, शोभा पगारे – धर्मशाळे, सुरेश पाटील, गणेश जगताप, बापू पिंगळे, मोतीलाल भामरे, सुरेश मानमोडे, अभिजीत मानमोडे, छाया भदाणे आदींनी केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.