Pimpri: मनुष्यबळाची कमतरता भरून काढण्यासाठी लघु उद्योग भारतीचे ‘उद्योग मित्र’ अभियान

Pimpri: Laghu Udyog Bharati's 'Udyog Mitra' campaign to fill the manpower shortage या अभियानांतर्गत रोजगार इच्छुक कामगारांसाठी मराठी भाषेत गूगल फॉर्म उपलब्ध करून देण्यात आला आहे.

एमपीसी न्यूज- औद्योगिक नगरी पिंपरी-चिंचवडमधील उद्योग सुरू होऊन साधारण दीड महिना उलटून गेला तरी कंपनीमध्ये कुशल व अकुशल कामगारांची कमतरता भासत आहे. यावर तोडगा काढण्यासाठी पिंपरी-चिंचवड लघुउद्योग भारतीतर्फे कामगार व उद्योग यांना जोडणारे ‘उद्योग मित्र’ अभियान हाती घेतले आहे.

गुरुवारी (दि.11) राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, पिंपरी चिंचवड शाखेचे कार्यवाहक विलास लांडगे यांच्या हस्ते झूम या अॅप्लिकेशनच्या मदतीने ‘उद्योग मित्र’ या अभियानाचे ऑनलाईन उद्घाटन करण्यात आले.

यावेळी लघु उद्योग भारतीचे सचिव राहुल खोले यांनी सर्वांचे स्वागत केले. लघु उद्योग भारतीचे अध्यक्ष दीपक फल्ले यांनी प्रास्ताविक करून उपक्रमाची माहिती दिली.

लॉकडाऊनमुळे गावी परतलेल्या कामगारांमुळे उद्योग जगतात कुशल व अकुशल कामगारांची मोठ्या प्रमाणात कमतरता भासत आहे. ही कमतरता भरून काढण्यासाठी लघुउद्योग भारती संघटनेतर्फे ‘उद्योग मित्र’ हे अभियान हाती घेतले आहे.

इच्छुक उमेदवारांनी हा गुगल फॉर्म भरून सबमिट करायचा आहे.

तसेच, ज्या उद्योगांना मनुष्यबळाची कमतरता आहे त्यांनासुद्धा इंग्रजी भाषेत एक गुगल फॉर्म उपलब्ध करून देण्यात आला आहे. हे दोन्ही अर्ज सोशल मीडियाच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती दिपक फल्ले यांनी दिली.

बेरोजगारांसाठी हेल्पलाईन उपलब्ध करून देण्यात आली आहे. रोजगार इच्छुक उमेदवारांना 7058643163 / 70586443164 या क्रमांकावर संपर्क साधता येणार आहे.

तसेच, उद्योजकांसाठी देखील हेल्पलाईन नंबर दिले आहेत. 7058643165/ 7058643166. या योजनेच्या अंमलबजावणीसाठी 4 प्रशिक्षित तरुण सेवा देणार आहेत आणि त्यांना मनुष्य बळ क्षेत्रातील काही तज्ञ् मार्गदर्शन करणार असून उद्योजकाची मागणी आणि कामगारांची उपलब्धता याची जोडणी करण्यासाठी हा प्रयत्न असणार आहे.

याप्रसंगी, केंद्रीय कार्यकारिणी सदस्य रवींद्र सोनावणे, लघु उद्योग भारतीचे विभागीय प्रमुख मंदार लेले यांनी सुद्धा मनोगत व्यक्त केले. पिंपरी-चिंचवड लघु उद्योजक संघटनेचे अध्यक्ष संदीप बेलसरे, स्पेक्टरम या औद्योगिक संघटनेचे प्रमुख पंकज शहा यांनी या उपक्रमासाठी शुभेच्या दिल्या.

लघु उद्योग भारतीचे खजिनदार प्रताप जाधव यांनी या उदघाटन सोहळ्याची सांगता केली.

ही योजना तयार करण्यात राहुल खोले, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पिंपरी-चिंचवड जिल्हा संपर्क प्रमुख महेश्वर मराठे आणि इतर पदाधिकाऱ्यानी मेहनत घेतली. या योजनेचा जास्तीत जास्त उद्योजक आणि कामगारांना फायदा करून घ्यावा असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.

बेरोजगारांना रोजगार मिळवून देण्याचा प्रयत्न

‘कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू केलेल्या संचारबंदीमुळे पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरातील उद्योगांमध्ये मनुष्यबळाची तीव्र कमतरता भासत आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी परवानगी मिळूनही उद्योग सुरू झाले नाहीत.

उद्योजकांची समस्या सोडविण्यासाठी लघुउद्योग भारती संघटनेने पुढाकार घेतला आहे. त्याअंतर्गत पुढील किमान दोन महिने उद्योग मित्र अभियानाचे कामकाज चालू राहणार आहे.

या माध्यमातून कामगार आणि उद्योजक यांच्यात समन्वय साधून बेरोजगारांना रोजगार मिळवून देण्याचा प्रयत्न केला जाईल’, असे लघुउद्योग भारती संघटनेचे अध्यक्ष दीपक फल्ले यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.