Pimpri : महात्मा फुले समता परिषदेच्या ‘संविधान वाचा आणि वाचवा’ अभियानास प्रारंभ; ‘संविधान’ भेट देऊन निमंत्रितांचा विशेष गौरव

एमपीसी न्यूज – महात्मा फुले समता परिषद शहर कार्यकारिणीच्या वतीने २०१९ या वर्षात सर्व क्षेत्रातील पुरस्कार प्राप्त झालेल्या मान्यवरांचा आणि विविध राजकीय पक्ष, सामाजिक संघटनांवर पदनियुक्ती झालेल्या मान्यवरांना ‘संविधान’ भेट देत ‘संविधान वाचा आणि वाचवा’ अभियानास प्रारंभ करण्यात आला.

भारतीय संविधान प्रत्येक नागरिकांनी वाचावे, कायद्याचे ज्ञान व्हावे, यातूनच वाचन चळवळ वाढावी म्हणून परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी सामाजिक कार्यक्रमात पारंपारिक पद्धत बाजूला ठेऊन यापुढे मान्यवरांचा सत्कार फक्त ‘सामाजिक विषयावरील पुस्तके भेट देऊन’ करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारातून प्रेरणा घेऊन ‘भारतीय संविधान’ हे पुस्तक भेट देऊन निमंत्रितांचा विशेष गौरव करण्यात आला.

जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते मानव कांबळे यांच्या अध्यक्षस्थानी पिंपरीत हा कार्यक्रम पार पडला. यावेळी नगरसेवक वसंत लोंढे, सुरेश म्हेत्रे, नरहरी शेवते, काळूराम गायकवाड, अ‍ॅड. प्रकाश मौर्य, डॉ. प्रकाश ढोकणे, नेहुल कुदळे, प्रताप गुरव, भरत आल्हाट, कांतीलाल भुमकर, गोविंद डाके, संजय जगताप, गिरीश वाघमारे, पांडुरंग महाजन, वंदना जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी मानव कांबळे म्हणाले, प्रत्येकाने एकदा तरी संविधान वाचावे. आजही ७५ टक्के नागरिक अज्ञानी आहेत. त्यांना संविधानच माहीत नाही, अशांना या चळवळीद्वारे सुशिक्षित करण्याची जबाबदारी आपली आहे.

अ‍ॅड. प्रकाश मौर्य म्हणाले, जे जे चांगले काम करतात, त्यांना मान आणि सन्मान दिलाच पाहिजे. फक्त मनुवादी विचारांना बाजूला करा.

यावेळी उच्चशिक्षित, यशस्वी राजकीय व्यक्तींना सिक्कीम राज्याकडून दिला जाणारा व स्काॅलर पाॅलिटिशन पुरस्कार यंदा प्रथम महिला महापौर, डॉ. अनिता फरांदे व अपर्णा डोके यांना राज्यपाल श्रीनिवास पाटील” यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. यासाठी त्यांचा व आनंदा कुदळे, नगरसेविका रेखा दर्शिले, हनुमंत माळी, प्रदीप पवार, विशाल जाधव, पुंडलिक सैंदाणे, ज्ञानेश्वर भुमकर, सुनील भुमकर, विलास गव्हाणे, अमित कांबळे इत्यादी विविध पुरस्कार प्राप्त व नियुक्त्यांसाठी गौरव करण्यात आला.

समता परिषदेचे शहराध्यक्ष अ‍ॅड. चंद्रशेखर भुजबळ यांनी स्वागत व प्रास्ताविक केले.  हरीश पोटे यांनी सूत्रसंचलन केले. सरचिटणीस राजेंद्र करपे यांनी आभार मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
You might also like