Pimpri: सावित्रीबाई फुले स्मारकाचे काम सात दिवसात पूर्ण करा- महापौर जाधव

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने पिंपरी चौकात उभारलेले सावित्रीबाई फुले स्मारकाचे काम सात दिवसात पूर्ण करण्यात यावे. पूर्णत्वाचा दाखल मिळाल्यानंतर, या इमारतीचे भूमी जिंदगी विभागाकडे हस्तांतर करावे. अभ्यासिका व ग्रंथालय पूर्ण क्षमतेने सुरु करण्यात यावे असे आदेश महापौर राहुल जाधव यांनी प्रशासनाला दिले.

सावित्रीबाई फुले स्मारक समिती सदस्यांनी महापौर जाधव यांची भेट घेतली. स्मारकाचे काम तातडीने पूर्ण करण्याची मागणी केली होती. या स्मारकात अभ्यासिका, सुसज्ज ग्रंथालय, महिलांसाठी प्रशिक्षण वर्ग, महात्मा फुले पुतळ्यास मेघडंबरी करण्याच्या मागण्या केल्या होत्या. या पार्श्‍वभूमीवर महापौर राहूल जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत नगरसेवक, समिती पदाधिकारी व अधिका-यांची संयुक्त बैठक गुरुवारी (दि.4) महापौर दालनात पार पडली. नगरसेवक संतोष लोंढे, सह शहर अभियंता प्रवीण तुपे, सहायक आयुक्त मंगेश चितळे, प्रभाग अधिकारी आशादेवी दुरगुडे, सावित्रीबाई फुले स्मारक समितीचे चंद्रकांत डोके, आनंदा कुदळे, काळुराम गायकवाड, संतोष जोगदंड, हनुमंत माळी, सुरेश गायकवाड, गिरीष वाघमारे, गुलाब पानपाटील, वैजनाथ शिरसाट, नंदा करे, संगीता आहेर, विलास गव्हाणे, कोंडीबा जाधव, सुखदेव खेडकर, बाळासाहेब भालेकर आदी उपस्थित होते.

महापौर जाधव म्हणाले, “शहराच्या वैभवात भर घालणा-या या इमारतीचा पूर्ण क्षमतेने वापर सुरु करण्यासाठी येत्या सात दिवसात रेंगाळलेली कामे प्रशासनाने मार्गी लावावीत. पुण्यातील ब्रिटीश लायब्ररीच्या धर्तीवर या इमारतीमध्ये सुसज्ज ग्रंथालय सुरू करण्यासाठी रखडलेले फर्निचरचे काम पूर्ण करुन, दर्जेदार ग्रंथसंपदा व साहित्य खरेदी करण्यात यावे”

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.