Pimpri: कोरोनाचा युवकांना विळखा, 2057 बाधित; जाणून घ्या कोणत्या वयोगटातील कितीजणांना झाली लागण?

Pimpri: Most corona infections in young people; 2057 infected, find out at what age how many people became infected? युवक कोरोना वाहक होऊ शकतात, असे महापालिका प्रशासनाकडून सांगितले जाते.

एमपीसी न्यूज- कोरोनाचा सर्वाधिक धोका लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांना आहे. पण, कोरोनाची लागण होण्याचे सर्वाधिक प्रमाण युवकांना आहे. कोरोनाने युवकांना अक्षरश: विळखा घातला आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील तब्बल 2057 युवकांना आजपर्यंत कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे युवक वर्गामध्ये चिंता आणि भीतीचे वातावरण आहे.

पिंपरी-चिंचवड शहरात कोरोनाचा कहर सुरुच आहे. मागील काही दिवसांपासून रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होत आहे. दिवसाला 400 ते 500 हून अधिक नवीन रुग्णांची भर पडत आहे. त्यामध्ये कोरोनाची लागण होण्याचे प्रमाण सर्वाधिक युवकांमध्ये आहे.

अनेक युवकांमध्ये कोरोनाची लक्षणे दिसून येत नाहीत. केवळ रिपोर्ट पॉझिटिव्ह येत आहेत. पण, युवकांना लागण झाल्याचे निष्पन्न होत आहे. युवक कोरोना वाहक होऊ शकतात, असे महापालिका प्रशासनाकडून सांगितले जाते.

कोणत्या वयोगटातील कितीजणांना कोरोनाची बाधा?

22 ते 39 वयवर्ष असलेल्या शहरातील 2057 युवकांना कोरोनाची आत्तापर्यंत लागण झाली आहे. हे सर्वाधिक प्रमाण आहे. त्याखालोखाल 40 ते 59 वयवर्ष असलेल्यांना लागण होण्याचे प्रमाण आहे. या वयोगटातील 1422 जणांना कोरोनाची लागण झाली आहे.

त्यानंतर 13 ते 21 वयवर्ष असलेल्या 597 तरुणांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. तर, 0 ते 12 वयवर्ष असलेल्या 532 लहान मुलांना कोरोनाची बाधा झाली आहे. याशिवाय 60 वर्षापुढील 596 वृद्धांना आजपर्यंत कोरोनाची लागण झाली आहे.

आजमितीला 1988 सक्रिय रुग्णांवर उपचार

10 मार्च ते 8 जुलै दरम्यान पिंपरी-चिंचवड शहरातील 5211 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यापैकी 3157 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. तर, 68 जणांचा मृत्यू झाला आहे.

आजमितीला 1988 सक्रिय रुग्णांवर उपचार सुरु आहेत. त्यापैकी 1163 रुग्णांमध्ये कोरोनाची काहीच लक्षणे नाहीत. केवळ त्यांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आहेत. तर, 522 रुग्णांमध्ये लक्षणे असून 43 रुग्णांची प्रकृती गंभीर आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.