Pimpri: मावळचा गड राखण्यासाठी खासदार बारणे सरसावले; संघटना बांधणीवर भर

शहरप्रमुखापाठोपाठ जिल्हा प्रमुखपदी लावली समर्थकांची वर्णी

एमपीसी न्यूज – मावळ लोकसभेचा गड पुन्हा एकदा राखण्यासाठी शिवसेनेचे खासदार श्रीरंग बारणे सरसावले आहेत. त्यादृष्टीने त्यांनी संघटना बांधणी करण्यास सुरुवात केली आहे. त्यासाठी शहरप्रमुखापाठोपाठ जिल्हा प्रमुखपदी आपल्या समर्थकांची वर्णी लावून घेतली आहे. युती होवो अथवा न होवो. याकडे लक्ष न देता बारणे लोकसभेच्या जोरदार तयारीला लागले आहेत.

लोकसभा निवडणुकीला केवळ सात ते आठ महिन्यांचा अवधी राहिला आहे. त्यामुळे सर्वंच पक्षांनी निवडणुकीची जोरदार तयारी सुरु केली आहे. यामध्ये शिवसेना आघाडीवर आहे. शिवसेनेने उमेदवार देखील निश्चित केले आहेत. मावळ लोकसभा मतदार संघातून प्रथमच निवडून येऊनही खासदार श्रीरंग बारणे यांचे संसदेतील काम अतिशय चांगले आहे. लोकमानसात मिसळणारा आणि त्यांची कामे केलेला खासदार अशी त्यांची ख्याती असल्याचे सांगत पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी नुकतेच पुण्यात झालेल्या बैठकीत बारणे यांच्या कामाचे कौतुक केले होते. तसेच आगामी निवडणुकीसाठी शिवसेनेची उमेदवारी बारणे यांना निश्चित असल्याचे त्यांनी सांगितले आहे. त्यामुळे बारणे यांनी निवडणुकीची जोरदार तयारी सुरु केली आहे.

संघटना बांधणीवर त्यांनी भर देण्यास सुरुवात केली आहे. त्यासाठी संघटनेतील महत्वाच्या पदांवर आपल्या समर्थकांची वर्णी लावून घेतली आहे. पिंपरी-चिंचवड शहराच्या प्रमुखपदी समर्थक योगेश बाबर यांची नियुक्ती केल्यानंतर आता जिल्हाप्रमुखपदी देखील आपले दुसरे समर्थक गजाजन चिंचवडे यांची वर्णी लावून घेतली आहे. यामुळे बारणे यांचे ‘मातोश्री’वर देखील वजन वाढल्याचे दिसून येत आहे.

मावळ लोकसभा मतदार संघ सलग दुस-यांदा शिवसेनेच्या ताब्यात आहे. नव्याने झालेल्या रचनेत 2009 मध्ये मावळ मतदार संघाची निर्मिती झाल्यानंतर गजानन बाबर यांनी तत्कालीन राष्ट्रवादीचे उमेदवार आझम पानसरे (आता भाजपात आहेत) यांचा पराभव केला आणि मावळावर भगवा फडकाविला होता. त्यानंतर 2014 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत श्रीरंग बारणे यांना शिवसेनेची उमेदवारी मिळाली. त्यांनी शेकाप, मनसे यांच्या पाठिंब्यावर निवडणूक लढविलेले भाजपचे शहराध्यक्ष व आमदार लक्ष्मण जगताप यांचा पराभव केला. त्यावेळी मोदी लाटेचा बारणे यांना मोठा फायदा झाला होता.

आता पिंपरी-चिंचवड शहरासह मावळ मतदार संघातील राजकीय गणिते बदलली आहेत. पिंपरी-चिंचवड, पनवेल महापालिकेत, तळेगाव दाभाडे, लोणावळा नगरपरिषेदत, देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डात भाजपची एकहाती सत्ता आहे. भाजपने आपले पाळेमुळे खोल रुजविली आहेत. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपला याचा फायदा होऊ शकेल. त्यामुळे आत्तापासूनच ‘दक्ष’ होता खासदार बारणे यांनी निवडणुकीची तयारी सुरु केली आहे. त्यांनी संपूर्ण मतदार संघ पिंजून काढला असून शड्डू ठोकले आहे. संघटनेवर देखील वर्चस्व निर्माण केले आहे. तसेच शिवसेनेला मानणारा मोठा वर्ग देखील या मतदार संघात आहे. या वर्गाला आपल्याकडे ठेऊन मावळातील विविध पक्षातील ‘नाराज’ असलेल्यांना असलेल्याना आपलंस करण्याचा देखील त्यांचा प्रयत्न राहण्याची शक्यता आहे.

एकूणच काय तर बारणे यांनी विरोधकांच्या तुलनेत लोकसभेची जोरदार तयारी सुरु केली आहे. बारणे यांची उमेदवारी निश्चित मानली जात असून आपला प्रतिस्पर्धी कोण असणार याचीच उत्सुकता त्यांना आता लागली असणार.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.