Pimpri: विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी महापालिका उभारणार ब्रॉडकास्टींग स्टेशन्स

Municipal Corporation will set up broadcasting stations for the education of students

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या शाळांमधील अभ्यासक्रम ऑनलाईन पद्धतीने सुरू करण्यात येणार आहेत. त्यासाठी महापालिकेतर्फे चार एफएम ब्रॉडकास्टींग स्टेशन्स उभारण्यात येणार आहेत. त्यासाठी केंद्र सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाकडे अर्ज सादर  करण्यात येणार असून त्यासाठी 10 हजार रूपये खर्च होणार आहे. 

पिंपरी – चिंचवड शहरात कोरोनाचा प्रादूर्भाव झपाट्याने वाढत आहे. राज्य सरकार आणि महापालिकेमार्फत कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी वेगवेगळ्या उपाययोजना राबविल्या जात आहेत.

त्याचाच एक भाग आणि खबरदारीचा उपाय म्हणून प्राथमिक आणि माध्यमिक शाळांमधील विद्यार्थ्यांनी एकत्र येऊ नये, सोशल डिस्टन्सिंगचे काटेकोर पालन व्हावे, यासाठी महापालिका हद्दीतील सर्व खासगी आणि सरकारी शाळा बंद ठेवण्यात आल्या आहेत.

पिंपरी – चिंचवड महापालिकेच्या शहरात 123 शाळा आहेत. त्यामध्ये 105 प्राथमिक आणि 18 माध्यमिक शाळा आहेत. प्राथमिक शाळांमध्ये 87 मराठी माध्यमाच्या, 14 उर्दू, तर हिंदी आणि इंग्रजी माध्यमाच्या प्रत्येकी दोन शाळा आहेत.

महापालिकेच्या प्राथमिक शिक्षण विभागाच्या मराठी, इंग्रजी, सेमी इंग्रजी, हिंदी आणि उर्दू माध्यमाच्या शाळा आहेत. तसेच माध्यमिक शिक्षण विभागाच्याही उर्दू, मराठी आणि सेमी इंग्रजी माध्यमाच्या शाळा आहेत.

शहरात अद्यापही कोरोनाचा कहर सुरूच आहे. शाळा बंद असल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. महापालिकेतर्फे ऑनलाईन पद्धतीने शाळा सुरू करण्यात येणार आहे.  त्याकरिता या शाळांसाठी महापालिकेचे चार एफएम ब्रॉडकास्टींग स्टेशन्स उभारण्याचे नियोजन आहे.

त्यासाठी केंद्र सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाकडे अर्ज सादर करण्यात येणार आहेत. या अर्जांसाठी प्रति अडीच हजार रूपये याप्रमाणे 10 हजार रूपये माहिती आणि प्रसारण मंत्रालयाकडे भरावे लागणार आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.