Pimpri News: स्मार्ट सिटीतील गोलमाल उघड होणार? आयुक्तांनी नगरविकास मंत्रालयाकडे पाठविला अहवाल

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड स्मार्ट सिटी प्रकल्पाबाबत अनेक तक्रारी प्राप्त झाल्याने नगरविकास मंत्रालयाने स्मार्ट सिटीच्या कामांबाबत महापालिकेला विचारणा केली. त्यानुसार महापालिका आयुक्त यांनी स्मार्ट सिटीमध्ये भ्रष्टाचार झाला आहे की नाही, कामात अनियमितता झाली की नाही, या बाबतचा सविस्तर अहवाल नुकताच राज्याच्या नगरविकास मंत्रालयाला पाठविला आहे.

गेल्या काही काळापासून शहरातील स्मार्ट सिटीच्या कामांबाबत अनेक तक्रारी प्राप्त होत आहेत. स्मार्ट सिटी अंतर्गत झालेली रस्ते खोदाई, सुशोभीकरण कार्यक्रम, गार्डन, सीसीटीव्ही बसविणे या सर्वच कामांत भ्रष्टाचार झाल्याचे आरोप विरोधी पक्षातील नगरसेवकांसह सत्ताधारी भाजपचे नगरसेवकही करत आहेत.

स्मार्ट सिटीच्या 250 कोटींच्या कामाला तांत्रिक मान्यता घेतली नसल्याचे उघड झाले. तसेच स्मार्ट सिटीच्या ठेकेदारांनी सर्व नियम धाब्यावर बसवत उपठेकेदार नेमले आहेत, असा आरोप नुकत्याच झालेल्या सर्वसाधारण सभेत सर्वपक्षीय नगरसेवकांनी केला.

स्मार्ट सिटीबाबत शहरातून मोठ्या प्रमाणात तक्रारी जात असल्याने नगरविकास मंत्रालयाने याबाबत महापालिका आयुक्त राजेश पाटील यांना पत्र पाठवत विचारणा केली. त्यानुसार पाटील यांनी स्मार्ट सिटीच्या कामांबाबत अहवाल नगरविकास खात्याला पाठविला आहे.

स्मार्ट सिटीबाबत नगरविकास मंत्रालयाला तक्रारी प्राप्त झाल्याने त्यांनी महापालिकेकडे स्मार्ट सिटीच्या कामांचा अहवाल मागविला. त्यानुसार नुकताच नगरविकास मंत्रालयाला स्मार्ट सिटीच्या कामाबाबत अहवाल पाठविल्याचे आयुक्त पाटील यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.