Pimpri News : गुगल अर्थव्दारे प्रभाग रचना करा; भाजपची मागणी

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेसह राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी प्रभाग रचना भौगोलिकदृष्ट्या अचूक होणे आवश्यक आहे. त्यासाठी गुगल अर्थ या ॲप्लीकेशनचा वापर करावा. तसेच प्रभाग रचनेत पारदर्शकता असावी म्हणून राजकीय हस्तक्षेप खपवून घेऊ नये, अशी मागणी भाजपचे मुख्य प्रवक्ते अमोल थोरात यांनी राज्य निवडणूक आयुक्तांकडे केली आहे.

यासंदर्भात अमोल थोरात यांनी राज्य निवडणूक आयुक्तांना निवेदन दिले आहे. त्यात नमूद केले आहे की, सर्वच पक्षांना स्थानिक स्वराज्य संस्था व महापालिका निवडणुकीचे वेध लागले आहेत. प्रभाग रचना ही लवकरच सुरू होईल. मात्र, प्रभाग रचना करताना राजकीय हस्तक्षेप होऊ शकतो. दबावतंत्र वापरले जाऊ शकते. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आहे. त्यामुळे राज्याच्या सत्ताधारी आघाडीतील घटक पक्ष प्रभाग रचनेत हस्तक्षेप करू शकतात.

राज्यातील महापालिकांमध्ये आपली सत्ता आणण्याच्या विचाराने सत्ताधाऱ्यांना पछाडले आहे. त्यासाठी प्रभाग रचना करताना त्यांच्याकडून हस्तक्षेप तसेच दबावतंत्राचा वापर होऊ शकतो. त्यामुळे त्यांना अपेक्षित असलेली वार्ड रचना त्यांच्याकडून करून घेतली जाऊ शकते. असे करताना भौगोलिक सीमांकडे दुर्लक्ष करून केवळ मतांचा विचार केला जाईल. यात प्रभागांची भौगोलिकदृष्ट्या मोडतोड  होईल.

शहरात नदी, नाले, रेल्वेमार्ग, तसेच महामार्ग असून, त्यामुळे शहराची ठराविक भागाची भौगोलिकदृष्ट्या विशिष्ट्य पद्धतीने विभागणी झाली आहे. त्या प्रत्येक भागातील वस्ती व तेथील रोजगार, राहणीमान आदी बाबतीत बदल असल्याचे दिसून येते. त्यामुळे प्रत्येक भागातील समस्या, गरजा आदी विभीन्न आहेत.

भौगोलिक सीमांचा विचार करून या प्रत्येक भागात विकासाचा समतोल साधणे आवश्यक आहे. त्यासाठी प्रभाग रचना भौगोलिक सीमांचा विचार करून होणे आवश्यक आहे. त्यामुळे प्रशासनाला विकासकामे करणे सहज शक्य होईल. तसेच नगरसेवकांनाही विकासकामांचा पाठपुरावा करणे सोपे होईल. यातून शहराच्या सर्वच भागात विकासाचा समतोल साधला जाऊ शकतो.

या सर्व बाबींचा विचार करता प्रभाग रचना पारदर्शकपणे होणे आवश्यक आहे. त्यात राजकीय हस्तक्षेप तसेच दबावतंत्र वापरण्यात येऊ नये, तसेच गुगल अर्थ या मोबाईल ॲप्लीकेशनचा वापर प्रभाग रचनेसाठी करावा, अशी मागणी अमोल थोरात यांनी निवेदनाव्दारे केली आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.