Pimpri News: स्थायीच्या 16 सदस्यांची चौकशी करण्यावर ‘एसीबी’ ठाम; सदस्यांचे धाबे दणाणले

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्थायी समितीमधील 16 सदस्यांची चौकशी करण्यावर लाचलुचपत प्रतिबंधक विभाग (एसीबी) ठाम आहे. एसीबीने आज पहिल्यांदाच 16 सदस्यांकडे चौकशी करण्याचे बाकी असल्याचे न्यायालयात सांगितले. त्यामुळे स्थायीतील भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि भाजप संलग्न अपक्ष सदस्यांना चौकशीला सामोरे जावे लागणार असल्याची दाट शक्यता आहे. यामुळे सदस्यांचे मात्र धाबे दणाणले आहेत. दरम्यान, तात्पुरत्या जामीनावर सुटलेले स्थायी समिती अध्यक्ष नितीन लांडगे यांचा जामीन कायम करण्यास नकार देत त्यांची आज न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे.

वर्क ऑर्डर मिळविण्यासाठीच्या करारनाम्यावर सही करण्यासाठी 1 लाख 18 हजार रुपयांच्या लाच प्रकरणाचा तपास करत असताना स्थायी समिती अध्यक्षांचे स्वीय सहाय्यक ज्ञानेश्वर पिंगळे यांनी ‘ते वर 16 जणांना द्यावे लागत’ असल्याचे रेकॉर्ड झाले आहे. ते 16 जण म्हणजेच स्थायी समितीचे 16 सदस्य यांच्याकडे चौकशी करणे बाकी आहे. त्यांच्यात व अटक केलेल्या 5 आरोपी यांच्यात काही ‘रॅकेट’ आहे का, याबाबत तपास करायचा आहे. या गुन्ह्याच्या सखोल तपास करणे बाकी असल्याचे एसीबीने आज (गुरुवारी) न्यायालयात सांगितले. यावरुन एसीबी स्थायी समितीतील 16 सदस्यांची चौकशी करण्यावर ठाम असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे समितीतील सदस्यांचे धाबे दणाणले आहेत.

स्थायी समितीत सत्ताधारी भाजपचे नितीन लांडगे यांच्यासह सुवर्णा बुर्डे, अंबरनाथ कांबळे, शशिकांत कदम, शत्रुघ्न काटे, अभिषेक बारणे, रवि लांडगे, संतोष कांबळे, सुरेश भोईर, भीमाबाई फुगे, भाजप संलग्न अपक्ष नीता पाडाळे, विरोधातील राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवीण भालेकर, राजू बनसोडे, सुलक्षणा धर, पोर्मिणा सोनवणे आणि शिवसेनेच्या मीनल यादव यांचा समावेश आहे. ‘एसीबी’ या सदस्यांची चौकशी करणार का याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. त्यातील भाजपचे रवी लांडगे यांनी राजीनामा दिला असून ते समितीच्या सभेला हजर राहत नाहीत. परंतु, त्यांचा राजीनामा अद्याप स्वीकारलेला नाही.

दरम्यान, वर्क ऑर्डर मिळविण्यासाठीच्या करारनाम्यावर सही करण्यासाठी 1 लाख 18 हजार रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी स्थायी समितीचे अध्यक्ष अ‍ॅड. नितीन ज्ञानेश्वर लांडगे, त्यांचे स्वीय सहाय्यक ज्ञानेश्वर किसनराव पिंगळे (मुख्य लिपिक), विजय शंभुलाल चावरिया, (पद लिपिक) , राजेंद्र जयवंतराव शिंदे (संगणक ऑपरेटर) आणि अरविंद भिमराव कांबळे, (पद शिपाई) यांना पोलिसांनी गुरुवारी (दि.19) पहाटे अटक केली होती. ते सर्वजण न्यायालयीन कोठडीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.