Pimpri news: कोविड सेंटरमध्ये महिलांवर होणाऱ्या अत्याचारांविरोधात भाजपचे मंगळवारी राज्यभरात आंदोलन

महिला प्रदेशाध्यक्षा उमा खापरे यांची माहिती

एमपीसी न्यूज – महाविकास आघाडी सरकारच्या काळात अवघ्या महाराष्ट्रात महिला सुरक्षेचा प्रश्न अतिगंभीर होत चालला आहे. त्यात कोरोना महामारीसारख्या अति संवेदनशील काळात कोविड केअर सेंटर आणि हॉस्पिटल्समध्ये महिलांवरील अत्याचार आणि विनयभंगाचे सत्र सुरू असल्याचा आरोप करत याविरोधात भाजप महिला मोर्चा उद्या (मंगळवारी) राज्यभर आंदोलन करणार आहे. याबाबतची माहिती प्रदेशाध्यक्षा उमा खापरे यांनी दिली.

उमा खापरे म्हणाल्या, राज्यातील मुली, महिला असुरक्षित आहेत. महिलांमध्ये भीतीचे वातावरण आहे. या सरकारच्या काळात रुग्णालयात देखील महिला सुरक्षित नाहीत. रुग्णालयात महिलांवर अत्याचार होत आहेत. हे अतिशय निंदनिय आहे. सरकारचे मोठे अपयश आहे. भाजप महिला मोर्चाने  प्रत्येक घटनेचे गांभीर्य ओळखून या घटनांचा प्रत्यक्ष पाठपुरावा केला. पीडित महिलांच्या कुटुंबियांना, स्थानिक पोलिस स्टेशनला भेट देऊन कारवाईची मागणी केली.

या घटनेबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निवेदन पाठविले. या निवेदनाचे गांभीर्य लक्षात घेऊन त्याला साधा विधायक प्रतिसाद देण्याची शिष्टाई देखील मुख्यमंत्र्यांनी दाखविली नाही. यावरून हे सरकार महिला सुरक्षिततेबाबत किती असंवेदनशील व निष्क्रिय आहे हेच स्पष्ट होते. या सरकारचा प्रशासनावर देखील अंकुश नसल्यामुळे प्रशासन देखील महिला अत्याचारांच्या सदर घटनांना गांभीर्याने घेत नाही.

महाविकास आघाडी सरकारच्या काळात कोविड केअर सेंटर आणि हॉस्पिटल्समध्ये महिलांवरील झालेल्या अत्याचारांच्या घटनांना वाचा फोडण्यासाठी मंगळवारी राज्यभर एकदिवसीय आंदोलन छेडण्यात येणार आहे. सर्व महापालिका आणि पोलीस आयुक्तांना निवेदन देण्यात येणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.