Pimpri News: महापालिका रस्ते सफाईच्या टेंडरमध्ये बोगस ‘बँक गॅरंटी’, कंपनीला काळ्या यादीत टाकून फौजदारी गुन्हा दाखल करा – तुषार कामठे

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिका अंतर्गत रस्ते सफाईचा ठेका मिळवण्यासाठी बनावट कागदपत्रांसह आता बोगस ‘बँक गॅरंटी’सादर करुन महापालिकेसह संबंधित बँकेचीही मोठी फसवणूक केली असल्याचा आरोप सत्ताधारी भाजपा नगरसेवक तुषार कामठे यांनी आज (गुरुवारी) पत्रकार परिषदेत केला. या प्रकरणी संबंधित कंपनीला काळ्या यादीत टाकून फौजदारी गुन्हा दाखल करावा अशी मागणीही त्यांनी केली.

महापालिका ‘अ’ आणि ‘ब’ क्षेत्रीय कार्यालयांतर्गत रस्ते-गटर सफाईच्या निविदेतून तब्बल 55 कोटी रुपयांच्या भ्रष्टाचार सुरू असल्याचा आरोप यापूर्वीच नगरसेवक कामठे यांनी महापालिका सर्वसाधारण सभेत केला होता. संबंधित सेक्युअर आयटी फॅसिलिटी मॅनेजमेंट ठेकेदार संस्थेने इंदापूर नगरपरिषद आणि तुळजापूर, जि. उस्मानाबाद येथील मुख्याधिकाऱ्यांची बनावट स्वाक्षरी करुन अनुभव कागदपत्रे आणि बोगस लेटरहेड सादर केल्याचे  सभागृहात सांगितले होते. मात्र, अद्याप महापालिका प्रशासनाने कोणतीही ठोस कारवाई केलेली नाही.  सेक्युअर आयटी फॅसिलिटी मॅनेजमेंट कंपनीकडून बोगस बँक गॅरंटी सादर केल्याचे समोर आले असून कोणतेही बँक गॅरंटी बँक प्रशासनाने दिलेले नाहीत, असा लेखी खुलासा करण्यात आला आहे. त्यामुळे सेक्युअर आयटी फॅसिलिटी मॅनेजमेंट कंपनीने महापालिका प्रशासनाची मोठी फसवणूक केल्याचे स्पष्ट होत असल्याचा दावा कामठे यांनी केला.

इंदापूर नगर परिषद, तुळजापूर नगर परिषदेचे बनावट कार्यादेश, बोगस स्वाक्षरी करुन करुन सादर केल्याचे पुरावे महापालिका सर्वसाधारण सभेत सर्व नगरसदस्यांसमोर सादर केले. त्यानंतर आता संबंधित सेक्युअर आयटी फॅसिलिटी मॅनेजमेंट कंपनीने बोगस बँक गॅरंटी सादर करुन प्रशासनाची जाणीवपूर्वक फसवणूक केल्याचे सिद्ध होत आहे.  आयुक्त राजेश पाटील यांनी कायदेशीर कारवाई करावी आणि महापालिकेची फसवणूक केल्याप्रकरणी संबंधितांवर फौजदारी गुन्हा दाखल करावा, अशी मागणीही नगरसेवक कामठे यांनी केली. गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ केली किंवा विलंब केला तर मी फौजदारी गुन्हा दाखल करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

https://youtu.be/E3jTgxKBl8g

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.