Pimpri News: महापालिका रुग्णालयात उपचार घेणाऱ्या कोरोना रुग्णांना रेमडेसिव्हीर इंजेक्शन मिळणार मोफत

महापौर उषा ढोरे, सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके यांची माहिती

एमपीसी न्यूज – कोरोनाच्या मध्यम व तीव्र लक्षणे असलेल्या   रुग्णांवर उपचारासाठी रेमडेसिव्हीर -100 मिग्रॅ हे इंजेक्शन वापरले जात आहे. महापालिकेच्या  रुग्णालयांमध्ये उपचार घेणाऱ्या कोविड-19 रुग्णांसाठी हे रेमडेसिव्हीर इंजेक्शन व औषधे मोफत दिली जाणार आहेत, अशी माहिती महापौर उषा ढोरे व सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके यांनी दिली.

वाढती कोरोना रुग्ण संख्या, त्यातच शहरातील सामान्य नागरिकांना बाजारातील रेमडेसिव्हीर इंजेक्शनचे अव्वाचे सव्वा दर परवडणारे नसल्यामुळे महापौर  ढोरे यांच्या सूचनेनुसार महापालिका आयुक्त राजेश पाटील यांनी पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून हा निर्णय घेतला असल्याचेही महापौर व पक्षनेते यांनी सांगितले.

राज्यातील शासकीय रुग्णालयामध्ये रेमडेसिव्हर इंजेक्शन मोफत उपलब्ध आहे. महापालिकेच्या रुग्णालयामध्ये उपचार घेणाऱ्या रुग्णांना हे औषध त्वरित मिळावे. तसेच डॉक्टरांनी हे इंजेक्शन लिहून दिल्यानंतर ते प्राप्त करून घेताना रुग्णांची / नातवाईकांची धावपळ होते. औषधांची किंमत जास्त असल्यामुळे जास्त रक्कम खर्च होते.

या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या रुग्णालयात उपचार घेणाऱ्या कोविड -19 रुग्णांना वेळेत इंजेक्शन मिळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

राज्यासह शहरात कोरोनाची दुसरी लाट सुरू झाली असून कोरोना संशयित रुग्णांमध्ये वाढ होत आहे. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये वेगाने चाचण्या सुरू आहे. कोरोना रोखण्यासाठी महापालिकेच्या वतीने सर्व स्तरावर प्रयत्न सुरू असून विनाकारण नागरिकांनी बाहेर न पडण्याचे आवाहन देखील करण्यात आले आहेत.

त्याचबरोबर  शहरातील   45 ते 60 या वयोगटातील दुर्धर आजाराने ग्रासलेल्या  नागरिकांसाठी महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये लसीकरण मोहीम सुरू करण्यात आली आहे. कोरोना वाढू नये, याची सर्वस्तरावरून महापालिकेकडून काळजी घेतली जात आहे, असे महापौर ढोरे, सत्तारुढ पक्षनेते ढाके यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.