SSC HSC Exam : दहावी-बारावीची परीक्षा ऑफलाईनच ; लेखी परीक्षेनंतर होणार प्रात्यक्षिक

शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांची माहिती

एमपीसी न्यूज – राज्यातील दहावी, बारवीच्या परीक्षा ऑफलाईन पद्धतीनेच होणार असल्याचे शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी सांगितले. तसेच, प्रात्याक्षिक परीक्षा ही लेखी परीक्षेनंतर होणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

दहावी व बारावी परीक्षेसंदर्भात घेण्यात आलेला निर्णय व अन्य महत्वाच्या सूचनांची माहिती शिक्षणमंत्री गायकवाड यांनी आज (शनिवार) पत्रकार परिषदेत दिली.

शिक्षणमंत्री गायकवाड म्हणाल्या, लेखी परीक्षेसाठी 30 मिनिटे अधिकचा वेळ देण्यात आलेला आहे. तसेच, दहावी, बारावीची प्रात्याक्षिक (प्रॅक्टिकल) परीक्षा ही लेखी परीक्षेनंतर होणार आहे. विशिष्ट लेखन कार्य (Assignment) गृहपाठ पध्दतीने प्रॅक्टिकल घेण्यात येतील.

बारावी सायन्सच्या विद्यार्थ्यांची प्रात्यक्षिके कमी करण्यात आली असून 5 ते 6 प्रात्यक्षिकावरच ही परीक्षा घेण्यात येईल व त्या संदर्भात माहिती कनिष्ठ महाविद्यालयांना स्वतंत्रपणे देण्यात येईल.

एखाद्या विद्यार्थ्यांस परीक्षा कालावधीमध्ये कोरोनाची काही लक्षणे जाणवत असल्यास अथवा कोरोनाचा प्रादुर्भाव झाल्यामुळे अथवा लॉकडाऊन, कन्टेनमेंट झोन, संचारबंदी अभावी परीक्षा देऊ न शकलेल्या विद्यार्थ्यांसाठी विशेष परीक्षेचे आयोजन जुन महिन्यामध्ये करण्यात येईल. ही परीक्षा केंद्र शहरी भागात ठराविक ठिकाणी व ग्रामीण भागात तालुक्याच्या मुख्यालयाच्या ठिकाणी निश्चित करण्यात येईल.

परीक्षा मंडळा मार्फत आयोजित केली जाणारी पुरवणी परीक्षा जुलै- ऑगस्टमध्ये घेण्यात येईल. या परीक्षेची केंद्रे शहरी भागात ठराविक ठिकाणी व ग्रामीण भागात तालुक्याच्या मुख्यालयाच्या ठिकाणी निश्चित करण्यात येतील, असे शिक्षणमंत्री गायकवाड यांनी स्पष्ट केले आहे.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.