Pimpri News: मार्चपासून दररोज पाणीपुरवठा तर तीन वर्षांनी शहराला चोवीस तास पाणी मिळेल

चोवीस तास पाणीपुरवठा करुनही नागरिकांकडून 135 लीटरपेक्षा पाण्याचा जास्त वापर

एमपीसी न्यूज – मागील दहा वर्षात पिंपरी-चिंचवड शहर झपाट्याने वाढले. परंतु, पाणी वाढले नाही. महापालिका पाणी वाढविण्यासाठी प्रयत्न करत आहे. चिखलीतील जलशुद्धीकरण केंद्राचे काम अंतिम टप्प्यात असून आंद्रा धरणातून 100 एमएलडी पाणी उचलण्यात येणार आहे. त्यामुळे मार्च-एप्रिलमध्ये दररोज पाणीपुरवठा होईल. तर, आणखी तीन वर्षांनी पाण्याची उपलब्धता वाढले. व्यवस्थित नियोजन झाल्यास संपूर्ण शहराला चोवीस तास पाणीपुरवठा सुरु होईल, असा विश्वास महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचे सह शहर अभियंता प्रवीण लडकत यांनी व्यक्त केला.

निगडीतील जलशुद्धीकरण केंद्रात लडकत यांनी आज (शुक्रवारी) पाणीपुरवठ्याची पत्रकारांना माहिती दिली. ते म्हणाले, मानांकनाप्रमाणे एका व्यक्तीसाठी दिवसाला ठरलेल्या 135 लीटरपेक्षा सुमारे 55 टक्के लोक दुप्पट पाणी वापरत असून अशा लोकांवर दंडात्मक कारवाई केली पाहिजे, नळ कनेक्शन तोडले पाहिजे. 2008 ते 2022 या कालावधीत मोठ्या प्रमाणात नागरिकरण वाढले. सदनिका झाल्या. 2001 ला 10 लाख, 2011 ला 17 लाख लोकसंख्या आहे. तेव्हा मानसीप्रतिदिन 250 लीटर पाणी दिले जात होते. परंतु, मागील दहा वर्षात 70 टक्के लोकसंख्या वाढली. लोकसंख्या वाढत चालली पण पाणी वाढले नाही. त्यामुळे मानसाला दिवसाला मिळणारे पाण्याचे प्रमाण कमी झाले.

मोरेवस्ती, सानेवस्ती, चिखली या भागात मोठ्या प्रमाणात घरे वाढली. या भागात 70 ते 75 हजार लोकसंख्या आहे. सुमारे 52 गल्ल्या आहेत. तीन मजली इमारती झाल्या पण इमारती खाली पाणी टाक्या नाहीत. एक दिवसाआड पाणीपुरवठा असल्याने त्यांची पाण्याची एकही तक्रार नाही. शहरातील इंडस्ट्रील भागाचे मोठ्या प्रमाणात रहिवाशीकरणात रुपांतर होत आहे. त्यामुळे या भागालाही महापालिकेला पाणीपुरवठा करावा लागत आहे. आयटूआर करण्यासाठी नियम तयार करणे आवश्यक आहे. 24 बाय 7 अंतर्गत प्लास्टिकचे पाईप टाकले. हे पाईप 50 वर्षे गंजत नाहीत. 24 बाय 7 अंतर्गत प्राधिकरण, आकुर्डी, संभाजीनगर, शाहुनगर, दिघी असा 40 टक्के भाग घेतला. तर, अमृत अंतर्गत 60 टक्के भाग घेतला आहे. 34 बाय 7 चे काम जवळपास संपले असल्याचे लडकत यांनी सांगितले.

चिखली जलशुद्धीकरण केंद्राचे काम अंतिम टप्प्यात आहे. निगडीतील जलशुद्धीकरण केंद्राची क्षमताही 100 एमएलडीने वाढवत आहोत. पुढील दोन ते अडीच वर्षात आद्रा, भामा-आसखेड असे 500 एमएलडी वाढीव पाणी मिळेल. नियोजनबद्ध काम झाल्यास संपूर्ण शहराला चोवीस तास पाणीपुरवठा होईल. पुढील तीस वर्षे पाणी पुरेल एवढी उपलब्धतता वाढविली जात आहे. 2010 ते 2022 पाणी वाढले नाही. त्यामुळे दिवसाआड पाणीपुरवठ्याची वेळ आली. पवना जलवाहिनीचा प्रश्न मार्गी लागला नाही. भविष्यात पवना आणि मुळशी हे दोन्ही धरणे जोडता येतील. बोगद्यातून पाणी घेता येईल. 9.55 किलो मीटर अंतर आहे. हे काम खर्चिक आहे. 100 एमएलडी पाणी आणण्यासाठी सुमारे 250 ते 300 कोटी रुपये खर्च येतो. महापालिकेला पाणीपट्टीतून केवळ 40 ते 45 कोटी रुपये उत्पन्न आहे, असेही त्यांनी सांगितले.

चोवीस तास पाणीपुरवठा होऊनही पाण्याचा वापर जास्त

निगडी, प्राधिकरणातील सेक्टर 26 मध्ये मागील सहा महिन्यापासून चोवीस तास पाणीपुरवठा सुरु आहे. मानांकणाप्रमाणे एका व्यक्तीला दिवसाला 135 लीटर पाणी वापरण्यास दिले जाते. पण, महापालिकेने केलेल्या तपासणीत 60 टक्के लोक 200 तर 28 टक्के लोक दिवसाला 500 लीटर पाणी वापरत असल्याचे आढळून आले. त्यानंतर केलेल्या तपासणीत 54 टक्के लोक 200 तर 18 टक्के लोक 500 लीटर पाणी वापरत होते. त्यामुळे चोवीस तास पाणीपुरवठा करुनही नागरिक 135 लीटरपेक्षा जास्त पाणी वापरतात. प्राधिकरणात आणखीही पाणी वापर कमी झालेला नाही. नागरिकांनी पाणी वाचविले पाहिजे. चुकीचे कनेक्शन, बेकायदेशीर नळजोड, महापालिका कार्यालयांचे नळजोड असे महसूल न मिळणारे 35 टक्के पाण्याचे प्रमाण आहे. 135 लीटरपेक्षा जास्त पाणी वापरणा-यांना शुल्क आकारले पाहिजे , असेही ते म्हणाले.

स्मार्ट सिटीअंतर्गत 9 हजार स्मार्ट मीटर स्मार्ट सिटीअंतर्गत शहरात 9 हजार स्मार्ट मीटर बसविण्यात येत आहेत. एका मीटरची किंमत 3 हजार रुपये आहे. रहिवाशी, व्यावासायिक भागातही हे मीटर बसविण्यात येत आहेत. 9 हजारपैंकी 7 हजार 500 मीटर बसविण्यात आले आहेत. त्याचे अद्याप रिडींग सुरु झाले नसल्याचे लडकत यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.