Pimpri News: वृद्ध रुग्णाच्या छातीमधील साडे तीन किलोची कर्करोगाची गाठ काढण्यात डॉक्टरांना यश

एमपीसी न्यूज – 70 वर्षीय वृद्ध रुग्णाच्या छातीमधील साडे तीन किलोची कर्करोगाची गाठ काढण्यात डॉ. डी. वाय. पाटील वैद्यकीय महाविद्यालयातील डॉक्टरांना यश आले. या शस्त्रक्रियेमुळे रुग्णाचा कर्करोगाचा धोका पूर्णपणे टळला आहे.

70 वर्षीय वृद्ध रुग्णाला छातीत त्रास होऊ लागल्याने त्यांना पिंपरी येथील डॉ.डी.वाय.पाटील वैद्यकीय महाविद्यालय, रुग्णालय व संशोधन केंद्र येथे दाखल करण्यात आले. रुग्णाच्या आवश्यक चाचण्यांनंतर छातीमधील अतिशय दुर्मिळ मांसल गाठ कर्करोग सापेक्ष (Solitary fibrous tumor) असल्याचे लक्षात आले. यासाठी शस्त्रक्रिया करणे हाच एक मार्ग रुग्णाला पूर्ण पणे बरा करणार होता. अशा केस मध्ये किमो व रेडिओ थेरपीचा उपयोग होत नाही. याची कल्पना रुग्णाच्या नातेवाईकांना देण्यात आली.

ही गाठ छातीच्या डाव्याबाजूला हृदय व फुप्फुसाच्या रक्त वाहिन्यांना चिकटलेली होती. या गाठेच्या दबावामुळे या दोन्ही अवयवांना रक्ताभिसरण होत नसल्याने त्याचे कार्य मंदावले होते. या अवयवांबरोबर रक्त वाहिन्यांना इजा नकरता शरीरामध्ये कर्करोगाचा प्रसार रोखण्याबरोबर रुग्णाचा जीव वाचवणे आणि कर्करोगाची गाठ काढण्याचे मोठे आव्हान डॉक्टरांसमोर होते. या शस्त्रक्रियेसाठी रुग्णाची पूर्ण छाती उघडी करून नंतर मोठ्या रक्तवाहिन्या व हृदय आणि फुप्फुस यांच्या आवरणाला चिकटलेली गाठ तेवढ्याच शिताफीने वेगळी केली. सुमारे पाच तास चाललेल्या ह्या गुंतागुंतीच्या शस्त्रक्रियेनंतर वीस सेंटीमीटर लांबीची साडे तीन किलोची कर्करोगाची गाठ काढण्यात डॉक्टरांना यश मिळाले.

या रुग्णावर चार दिवस अतिदक्षता विभागात (ICU) मध्ये डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार सुरू होते. या 70 वर्षीय वृद्धाने या उपचारांना सकारात्मक प्रतिसाद दिला. या शस्त्रक्रियेमुळे रुग्णाचा कर्करोगाचा धोका पूर्ण पणे टळला आहे. या रुग्णाला दोन दिवसांनी घरी सोडण्यात येणार आहे. सर्वांचे आभार व्यक्त करताना रुग्ण व नातेवाईक खूप भावनिक झाले होते.

या शस्त्रक्रियेसाठी भूल शास्त्र विभाग प्रमुख डॉ. स्मिता जोशी यांची टीम, रेडिओलॉजीचे विभाग प्रमुख डॉ. पी के लामघरे व पॅथॉलॉजी विभाग प्रमुख डॉ. चारुशीला गोरे तसेच हृदय शल्य विभाग प्रमूख डॉ. अनुराग गर्ग व श्वसनविकार विभाग प्रमूख डॉ एम. एस. बरथवाल यांच्या टीमची मोलाची मदत झाली.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.