Pimpri News: शिक्षण विभागातील कर्मचारी धास्तावले, 35 कर्मचाऱ्यांपैकी 25 जणांचे बदलीसाठी अर्ज

एमपीसी न्यूज – शिक्षक भरती घोटाळ्यातील आरोपींमध्ये पिंपरी-चिंचवड महापालिका प्राथमिक शिक्षण विभागाच्या प्रशासन अधिकारी ज्योत्स्ना शिंदे यांचा सहभाग उघड झाल्याने आणि त्यांचा जामीन अर्ज फेटाळल्याने शिक्षण विभागातील कर्मचारी धास्तावले आहेत. त्यातूनच 35 कर्मचाऱ्यांपैकी तब्बल 25 कर्मचाऱ्यांनी बदलीसाठी अर्ज केले आहेत. शाळा बंद असताना टेबल, खुर्चाची खरेदी, शिक्षक भरती प्रकरण, ठेकेदाराचा वर्चस्व अशा अनेक कारणांमुळे शिक्षण विभाग सातत्याने चर्चेत असतो.

महापालिका आस्थापनेवरील गट ‘अ’ ते ‘ड’ मधील एप्रिल, मे महिन्यात बदलीसाठी पात्र ठरणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांची यादी पाठवावी. तसेच ज्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना वैयक्तीक अथवा वैद्यकीय कारणास्तव बदली हवी असेल, असे अर्जही विभागप्रमुखांनी 18 फेब्रुवारी पर्यंत प्रशासन विभागाकडे पाठवावेत असे पत्रक प्रशासनविभागाने विभागप्रमुखांना काही दिवसांपूर्वी पाठविले होते.

शिक्षण विभागातील एकाचवेळी 25 कर्मचाऱ्यांनी बदलीसाठी अर्ज केल्यामुळे हा सध्या चर्चेचा विषय झाला आहे. वारंवार शिक्षण विभागावर होणारे आरोप, कामाचा ताण यामुळे कर्मचारी दुसऱ्या विभागात जाण्यास कर्मचारी इच्छुक आहेत. काही कर्मचारी शिक्षण विभागात अनेक वर्षांपासून कार्यरत आहेत. काही कर्मचारी पाच ते सहा वर्षांपासून आहेत. तर काहींना शिक्षण विभागात येवून तीन वर्ष पण पूर्ण व्हायचे आहेत. तरी, देखील त्यांनी बदलीसाठी अर्ज केला आहे. शिक्षण विभागातील भोंगळ कारभारामुळे कर्मचारी विभागात काम करण्यास इच्छुक नसल्याचे दिसून येत आहे.

याबाबत विचारले असता माध्यमिक विभागाचे प्रभारी प्रशासन अधिकारी पराग मुंढे म्हणाले, ”शिक्षण विभगातील 25 कर्मचाऱ्यांनी बदलीसाठी अर्ज केले आहेत. बदलीसाठी विभाग प्रमुखांकडे अर्ज करावा लागतो”.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.