Pimpri News: ‘सीसीसी’ सेंटरमध्ये रुग्ण नसताना  बीले सादर करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करा – गजानन बाबर

एमपीसी न्यूज – करारनामा केला नसताना तसेच कोविड सेंटरमध्ये एकही रुग्ण नसताना स्पर्श हॉस्पीटलचे डॉ. अमोल हळकुंदे यांच्यामार्फत 5 कोटी 26 लाख 60 हजार 800 रुपयांची बिले महापालिकेला कशी सादर केली ?, हा खूप गंभीर गुन्हा आहे. याप्रकरणाची सखोल चौकशी करावी. दोषी अधिकाऱ्यांवर फौजदारी कारवाई करण्याची मागणी माजी खासदार गजानन बाबर यांनी केली आहे.

याबाबत नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, आरोग्य मंत्री राजेश टोपे यांना निवेदन पाठविले आहे. त्यात बाबर यांनी म्हटले आहे की, कोरोना वैश्विक महामारीच्या काळात नागरिकांना खूप त्रासाला सामोरे जावे लागले. त्यातच पिंपरी-चिंचवड महापालिकेत अधिकाऱ्यांनी रुग्ण नसताना कोट्यवधी रुपयांची बिले महापालिकेकडे दिली आहेत.

भोसरीमधील रामस्मृती मंगल कार्यालय आणि हिरा लॉन्स या ठिकाणी सुरु करण्यात आलेल्या कोविड केअर सेंटरमध्ये एकही रुग्ण दाखल झालेला नसताना डॉ. अमोल हळकुंदे यांच्यामार्फत 5 कोटी 26 लाख 60 हजार 800 रुपयांची बिले महापालिकेला कशी सादर केली जातात ?. हा खूप गंभीर गुन्हा आहे.

वास्तविक पाहता करारनामा झाल्यानंतरच बिले सादर केली जातात किंवा कोणतीही प्रशासकीय काम केले जाते. परंतु, संस्थेच्या कार्यारंभ आदेशातील अटीनुसार त्यांच्यामार्फत अर्नेस्ट मनी डिपॉझिट भरण्यात न आल्याने तसेच मनुष्यबळाची माहिती न दिल्याने करारनामा करण्यात आला नाही.

कोविड सेंटरमध्ये रुग्ण नसताना बिले सादर करणे हा अक्षम्य गुन्हा आहे. या विषयाची आपण गांभीर्याने दखल घेऊन तात्काळ चौकशी करण्याचे आदेश महापालिकेला देण्याची मागणी बाबर यांनी निवेदनात केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.