Pimpri News: ‘ओबीसींच्या राजकीय आरक्षणासाठी सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल करा’

ओबीसी संघटनांची मागणी ; डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौकात आंदोलन

एमपीसी न्यूज – सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या रीट याचिकेवर न्यायालयाने दिलेल्या निकालामुळे देशभरातील स्थानिक स्वराज्य संस्थामधील ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण रद्द झाले आहे. ते पूर्ववत रहावे, यासाठी केंद्र आणि राज्य सरकारच्या वतीने सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल करावी, या मागणीसाठी आज (गुरुवारी) विविध संस्था, संघटना आणि पक्ष प्रतिनिधींच्या वतीने आंदोलन करण्यात आले.

पिंपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौकात झालेल्या आंदोलनात पिंपरी-चिंचवड शहरातील विविध पक्षांचे आजी, माजी नगरसेवक, विविध संस्था संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते. ‘उठ ओबीसी जागा हो, एक ही मिशन ओबीसी आरक्षण, शिव, फुले, शाहु, आंबेडकर विचारांचा विजय असो’, ‘संविधान आरक्षण के सन्मान में, ओबीसी मैदान में’, ‘उठ ओबीसी जागा हो, आरक्षणाचा धागा हो’, अशा जोरदार घोषणा यावेळी आंदोलकांनी दिल्या.

ओबीसी संघर्ष समिती, बारा बलुतेदार महासंघ, महाराष्ट्र राज्य प्रजा लोकशाही परिषद, महाराष्ट्र राज्य लोकशाही बचाव समिती, महात्मा फुले समिती परिषद, महाराष्ट्र राज्य विश्वकर्मीय सुतार समाज समन्वय समिती, ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले स्मारक समिती, ओबीसी महासभा महाराष्ट्र प्रदेशभारतीय प्रजा सुराज्य पक्ष, प्रहार संघटना, महाराष्ट्र नाभिक महासंघ, वंचित बहुजन आघाडी, भाजपा ओबीसी आघाडी, अखिल महाराष्ट्र विश्वकर्मा सुतार समाज महासंघ पुणे, महाराष्ट्र नाभिक महामंडळ, महाराष्ट्र परीट ( धोबी) सेवा मंडळ, महात्मा फुले मंडळ, श्री विश्वकर्मा सेवा भावी संस्था, श्री विश्वकर्मा वेल फेअर फाऊंडेशन, महाराष्ट्र कुंभार समाज महासंघ, कुंभार समाज सामाजिक संस्था, महाराष्ट्र कुंभार विकास संस्था, सत्य शोधक नागरिक मंच, महाराष्ट्र माळी समाज महासंघ या संस्थांचे पदाधिकारी सहभागी झाले होते.

या आंदोलनानंतर तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.