Pimpri news: हाथरस दुर्घटना; महिला काँग्रेसने पंतप्रधानांसह उत्तरप्रदेशच्या मुख्यमंत्र्यांना पाठविली पाच हजार ‘पोस्टकार्ड’

एमपीसी न्यूज – उत्तर प्रदेशातील हाथरस येथील सामूहिक बलात्काराच्या घटनेस एक महिना झाला तरी, याबाबत एकही शब्द न बोलणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना महिलांवर होणा-या अन्याय अत्याचाराबाबत थोडीही संवेदना नाही, असा आरोप करीत महिला काँग्रेसच्या वतीने ‘पीडित महिलांना बदनाम करणे भाजपाने थांबवावे’ हे पोस्टकार्ड अभियान राबविले. या अभियानांतर्गत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना पाच हजार पोस्टकार्ड पाठविण्यात आले.

हाथरस घटनेबाबत उत्तर प्रदेश सरकारचा व केंद्र सरकारचा निषेध करण्यासाठी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा सोनिया गांधी, खासदार राहुल गांधी, सरचिटणीस प्रियांका गांधी, महिला काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुष्मिता देव, महिला प्रदेशाध्यक्षा चारुलता टोकस यांच्या मार्गदर्शनाखाली ‘ पीडित महिलांना बदनाम करणे भाजपाने थांबवावे’ हे पोस्टकार्ड अभियान राबविले.

या अभियानाअंतर्गत आज (सोमवारी) शहर महिला काँग्रेसच्या वतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना पाच हजार ‘पोस्टकार्ड’ पाठविण्यात आले. यामध्ये ‘पिडीत महिलेला न्याय पाहिजे, बदनामी नाही’, असा मजकूर आहे.

चिंचवड स्टेशन, पोस्ट ऑफीस येथे झालेल्या या कार्यक्रमास काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन साठे, महिला काँग्रेसच्या माजी प्रदेशाध्यक्षा शामला सोनवणे, मीना गायकवाड, हुरबानो शेख, सुनिता कामथे, वैशाली कुदळे, विजया लोणी आदी उपस्थित होते.

हाथर्स प्रकरणातील पीडित तरुणीच्या मृतदेहावर तिच्या नातेवाईकांच्या परस्पर रात्रीमध्ये पोलीस प्रशासनाने अंत्यसंस्कार केले. हा प्रकार मानवी हक्कांची पायमल्ली करणारा आहे, अशी टीका काँग्रेसच्या महिला शहराध्यक्षा गिरीजा कुदळे यांनी केली.

डॉ. मनमोहन सिंग पंतप्रधान असतानाच्या काळात अशा घटनांबाबत वेळोवेळी रस्त्यांवर येऊन आंदोलन करणा-या व तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांना बांगड्या पाठविणा-या स्मृती इराणी अजुनही गप्प का आहेत? असा सवाल करत कुदळे म्हणाल्या, हे अभियान पिंपरी, चिंचवड आणि भोसरी विधानसभा मतदार संघात राबविले. यामध्ये महिलांनी घरोघरी जाऊन पोस्टकार्ड लिहून घेतले.

यावेळी भाजपाच्या व मुख्यमंत्री योगी यांच्या कार्यप्रणालीबाबत तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या. या घटनेबाबत सर्व थरातील महिलांमध्ये तीव्र रोष आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.