Pimpri News: नागरिकांनी स्वत:हून अनधिकृत पत्राशेड काढावेत, महापालिकेचे आवाहन

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेने नोटीसा देऊनही नागरिकांनी अनधिकृत पत्राशेड काढले नाहीत. त्या पत्राशेडवर महापालिका कारवाई करणार आहे. त्यामुळे नागरिकांनी स्वत:हून 30 सप्टेंबरपर्यंत अनधिकृत पत्राशेड काढावेत, असे आवाहन महापालिका आयुक्त राजेश पाटील यांनी केले आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीतील अनधिकृत पत्राशेड धारकांना यापूर्वी पत्राशेड काढून महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियम 1966 चे कलम 53 व 55 तसेच महाराष्ट्र नगरपालिका अधिनियमचे कलम 478  नुसार बांधकाम परवानगी व अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभागामार्फत नोटीसा देण्यात आल्या आहेत. तथापि, अद्यापही अनधिकृत पत्राशेड धारकांनी स्वतःहून अनधिकृत बांधकामे काढून / निष्कासित केले नाही असे दिसून आले आहे.

अनधिकृत पत्राशेड धारकांनी सप्टेंबर अखेरपर्यंत स्वतःहून अनधिकृत पत्राशेड काढून / निष्कासित करुन घ्यावेत. ज्या नागरिकांनी स्वतःहुन अनधिकृत पत्राशेड काढून / निष्कासित केली नाहीत. अशा अनधिकृत बांधकाम / पत्राशेडवर बांधकाम परवानगी व अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभागामार्फत निष्कासनाची कारवाई करण्यात येईल. या कारवाईचा खर्च संबंधित मालकांकडून वसुल करण्यात येईल. तसेच कारवाईमुळे झालेल्या नुकसानास पिंपरी-चिंचवड महापालिका जबाबदार राहणार नाही, याची स्पष्ट नोंद घ्यावी, असे महापालिकेने स्पष्ट केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.