Pimpri News: राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांचे भाजपाला प्रतिआव्हान

भ्रष्टाचार व विकासाच्या मुद्यावर विशेष पालिकेची विशेष सभा बोलावण्याची मागणी

एमपीसी न्यूज: राष्ट्रवादी काँग्रेसने 15 वर्षांत काय विकास केला आणि पाच वर्षांत भाजपाने काय विकास केला, अशा मुद्यावर समोरासमोर खुली चर्चा करा, असे आव्हान भाजपाचे शहराध्यक्ष महेश लांडगे यांनी शुक्रवारी राष्ट्रवादी काँग्रेसला दिले. राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांनी आपण केव्हाही खुल्या चर्चेसाठी तयार आहोत, असे म्हणत ते आव्हान स्विकारले आहे.

भाजपाने महापालिकेची विशेष सर्वसाधारण सभा बोलवावी आणि फक्त भ्रष्टाचार व विकास याच विषयावर चर्चा करावी आणि नागरिकांसाठी माध्यमांतून लाईव्ह प्रक्षेपण करावे, असे खुले प्रतिआव्हान गव्हाणे यांनी भाजपाला दिले आहे.

 

शुक्रवारी राष्ट्रवादी काँग्रेसने महापालिकेतील भ्रष्टाचाराचा मुद्दा घेत भाजपा विरोधात अतिविराट असा मोर्चा काढला होता. मोर्चाचा रंग पाहूण भाजपाने पत्रकावर पत्रके काढत राष्ट्रवादीच किती भ्रष्ट आहे, असा युक्तिवाद सुरू केला. सोशल मीडियावर भाजपाच्या टीमने राष्ट्रवादीला सरळ सरळ टार्गेट केले. आमदार महेश लांडगे यांनी भ्रष्टाचारावर चर्चा करायचीच तर राष्ट्रवादीची राज्यातील महाआघाडी सरकारची तसेच महापालिकेतील अनेक प्रकऱणे आपल्याकडे असल्याचा झाशा दिला.

 

अजित गव्हाणे यांनी त्यावर बोलताना, गल्ली ते दिल्ली भाजपाकडे सत्ता होती. आम्ही खरेच खोटी कामे केली असतील तर तुमची सत्ता होती, तुम्ही चौकशी करायला पाहिजे होती. तुमचे कोणीही हात धरले नव्हते. गेल्या पाच वर्षांत भाजपाचाच बेसुमार भ्रष्टाचार लोकांच्या समोर आला, वर्तमानपत्रांतूनही गाजला. त्यात महापालिकेची प्रतिमा मलीन झाली. अत्यंत गंभीर आरोप होत असतानाही भाजपाचे नेते मूग गिळून गप्प बसले होते. खरे तर, चौकशी करायला पाहिजे होती. आमच्याकडे अनेक प्रकरणे आहेत, असे सांगून केवळ ब्लॅकमेलिंग करू नका. हिंमत असेल तर चर्चा करा, असे आव्हान अजित गव्हाणे यांनी दिले आहे.

भाजपाच्या भ्रष्ट प्रतिमेबद्दल बोलताना गव्हाणे यांनी काही दाखले दिले. ते म्हणाले, भाजपाचे स्थायी समिती अध्यक्ष लाचखोरीत सापडले. माजी उपमहापौर खंडणी प्रकरणात आठ दिवस जेलमध्ये होते. स्थायी समितीच्या एका माजी अध्यक्षाला भ्रष्टाचाराच्या प्रकरणात काही नगरसेवकांनी अक्षरश: लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. या तीनही घटना भाजपा काय आहे ते सांगण्यास पुरेशा आहेत. याशिवाय पुतळा ते पूल, नदी असे भ्रष्टाचाराचे असंख्य पुरावे देता येतील.

स्मार्ट सिटी कामातील भ्रष्टाचारामुळे शहराची पुरती नाचक्की झाली. या सगळ्या विषयावर चर्चेला भाजपा तयार नाही, कारण ते त्यांच्याच अंगावर येतील. भाजपा पळ काढते आहे. लोकांच्या समोर सत्य यायला पाहिजे म्हणून जाहिरपणे चर्चेला आम्ही केव्हाही तयार आहोत, असे गव्हाणे म्हणाले.

गेल्या वेळी राष्ट्रवादीवर पोकळ आरोप करून लोकांमध्ये संभ्रम निर्माण केला. भाजपा त्यांच्या स्वभावानुसार खोटे बोल पण रेटून बोलले. खोटेपणा केला आणि तथ्यहीन आरोपांतून महापालिकेतील सत्ता मिळवली. त्यामुळेच भाजपाचे चर्चेचे आव्हान म्हणजे निव्वळ स्टंटबाजी आहे. कारण तुमच्यात खरोखर हिंमत असती तर महापालिका सभा नगरसेवकांची मुदत (13मार्च) संपल्यानंतर 17 मार्चला ठेवली नसती, असा शेरा त्यांनी मारला.

भाजपाचे नेते, नगरसवेक घाबरले कारण भ्रष्टाचाराच्या मुद्यावर त्यांचे पानिपत झाले असते आणि अजित पवार यांनीच शहराचा विकास केला आहे, हे राज्यातील जनता जाणते. भाजपाची विकासाची संकल्पना निव्वळ व्हाटसएप इमेजवर आहे, अशी टिप्पणी गव्हाणे यांनी केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.