Maval News: आमदार शेळके यांच्यावर चिंचवड, कर्जत, खडकवासला मतदारसंघांची जबाबदारी

एमपीसी न्यूज – आगामी महापालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे मावळचे आमदार सुनील शेळके यांच्यावर पक्ष नेतृत्वाने मोठा विश्वास टाकला आहे. चिंचवड, कर्जत, खडकवासला या तीन विधानसभा मतदारसंघांची जबाबदारी सोपविली आहे. तीनही मतदारसंघात पक्ष संघटना बळकट करणे तसेच गटबाजी संपविण्याच्या सूचना आमदार शेळके यांना दिल्या आहेत. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष, जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी शेळके यांची नियुक्ती केली आहे.

सन 2019 च्या महत्वपूर्ण विधानसभा निवडणुकीमध्ये आमदार शेळके विरोधकांवर मात करुन मोठ्या मताधिक्याने निवडून आले आहेत. शेळके आपल्या मतदारसंघातील जबाबदारी पार पाडत आहेत. विकास कामांवर देखील लक्ष ठेऊन कार्यरत आहेत. त्यांच्यावर पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष, खासदार शरद पवार यांच्या सूचनेनुसार पक्षवाढीच्या दृष्टीकोनातून खडकवासला, कर्जत आणि चिंचवड या विधानसभा मतदारसंघांची जबाबदारी सोपविण्यात आली आहे, असे पाटील यांनी पत्रात म्हटले आहे.

या तीनही विधानसभा मतदारसंघातील आपल्या पक्षाचे उमेदवार यांच्याशी समन्वय साधून सर्व तालुक्यांचा दौरा करावा. विधानसभा मतदारसंघातील प्रमुख नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते यांची बैठक घेऊन बूथ बांधणी, प्रदेश स्तरावरील कार्यक्रमांचे नियोजन, विधानसभा मतदारसंघातील पक्ष संघटना बळकट व मजबूत करण्याच्या दृष्टीने पक्ष संघटनेची रचना लक्षात घेऊन योग्य नियोजन करावे, अशा सूचना आमदार शेळके यांना देण्यात आल्या आहेत. आगामी काळात होणाऱ्या महापालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकांच्या दृष्टीनेही पूर्वतयारी करावी. पुढील विधानसभा निवडणूक 2024 मध्ये पक्षाचा उमेदवार विजयी व्हावा, हे उदिष्ट समोर ठेवून जबाबदारी पार पाडावी. त्यासाठी वारंवार दौरा करावा. त्या मतदारसंघातील गट तट संपविणे, पक्षात आवश्यकतेनुसार राजकीय प्रभावी व्यक्तींना आणणे, याबाबत काही सूचना, निरीक्षण आपण तत्परतेने कळवावे. आपला सहभाग महत्त्वाचा असून त्यानुसार वरिष्ठ पातळीवर दखल घेऊन पुढील नियोजन करण्यात येईल, असे प्रदेशाध्यक्ष पाटील यांनी आमदार शेळके यांना दिलेल्या नियुक्तीपत्रात म्हटले आहे.

चिंचवडमध्ये लक्ष्मण जगताप यांच्यासमोर आव्हान आगामी पिंपरी-चिंचवड महापालिकेची निवडणूक पुढील काही महिन्यात होण्याची शक्यता आहे. महापालिका पुन्हा ताब्यात घेण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कंबर कसली आहे. त्यापार्श्वभूमीवर आपल्या विश्वासू सहकाऱ्यांवर महत्त्वाची जबाबदारी सोपविली जात आहे. त्याच अनुषंगाने चिंचवड विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी आमदार शेळके यांच्यावर सोपविली आहे. शेळके यांची तरुणाईमध्ये मोठी क्रेझ आहे. चिंचवड मतदारसंघातून जास्तीत-जास्त नगरसेवक निवडून आणण्यावर राष्ट्रवादीने भर दिला असल्याचे दिसून येते. आमदार जगताप यांच्यासमोर युवा आमदार सुनील शेळके यांचे आव्हान असेल, असे राजकीय जाणकार बोलतात.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.