Pimpri News: महापालिका अधिकाऱ्यांच्या सतर्कतेने वृद्धाला मिळाला निवारा

अजमेरा कॉलनी येथे प्लॉगेथॉन उपक्रम राबवताना रस्त्याच्या कडेला आढळली बेवारस व्यक्ती

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरात सुरू असलेली स्वच्छ सर्वेक्षण मोहीम ही केवळ परिसर स्वच्छ करण्यापुरतीच मर्यादित राहिलेली नसून शहरातील प्रत्येक नागरिकाला निरामय आयुष्य जगता यावे अशा व्यापक स्वरूपाची असल्याचा प्रत्यय नुकताच आला.  महापालिकेने हाती घेतलेल्या स्वच्छ सर्वेक्षण मोहिमेअंतर्गत सुरू असलेल्या मासुळकर कॉलनी येथील हिंदुस्थान अँटिबायोटिक कंपनीच्या मैदान परिसरात  प्लॉगेथॉन उपक्रमात येथे रस्त्याच्या कडेला बेवारस पडलेल्या एका वृद्धाला  निवारा प्राप्त झाला आहे. महापालिकेचे सहाय्यक आयुक्त अण्णा बोदडे यांच्या सतर्कतेमुळे या वृद्धाला आता निरामय आयुष्य जगता येणार आहे.

स्वच्छ सर्वेक्षण 2020 मध्ये पिंपरी चिंचवड शहराची देशस्तरावर चांगली प्रगती झाली आहे. यंदा कचरामुक्त शहराचे सेवन स्टार मानांकन मिरवण्याकरिता महापालिकेने कंबर कसली आहे. स्वच्छ सर्वेक्षण 2022 मध्ये या शहराला देशातील सर्वात स्वच्छ आणि सुंदर शहर बनविण्याचाही महापालिकेने संकल्प केला आहे. त्या दृष्टीने जनजागृती करून लोकसहभाग वाढवण्यासाठी विविध माध्यमांचा वापर करण्यात येत आहे. कचरा विलगीकरणाबाबत फेसबुक, ट्विटर,स्वच्छ मंच, व्हॉट्सॲप या समाजमाध्यमांद्वारे स्वच्छताविषयक विविध संदेश प्रसारित करण्यात येत आहेत.

महापालिकेचे आयुक्त राजेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शहरात विविध ठिकाणी प्लॉगेथॉन मोहिमेचे आयोजन करून लोकसहभागातून कचरा गोळा करण्याचे उपक्रम राबवले जात आहेत. नदी स्वच्छता अभियान राबवून पर्यावरणविषयक जनजागृती आणि जाणीव निर्माण करण्यासाठी महापालिका प्रयत्न करीत आहे. स्वच्छता कर्मचाऱ्यांसाठी क्षमता बांधणी कार्यशाळा तसेच सोसायाटीधारक, औद्योगिक कंपन्या, हॉटेल, रेस्टॉरंट व्यावसायिक आदींच्या कार्यशाळा घेऊन कचरा वर्गीकरणाबाबत माहिती देऊन शहरातील कानाकोपरा स्वच्छ राहिला पाहिजे. याचा कटाक्ष महापालिकेच्या वतीने पाळला जात आहे. तर दुसरीकडे शहर स्वच्छ होताना शहरातील प्रत्येक नागरिक निरामय आयुष्य जगला पाहिजे याकडे देखील पाहिले जात असल्याचा एक अनुभव नुकताच आला.

अजमेरा कॉलनी येथे 1 मार्च रोजी प्लॉगेथॉन मोहिमे अंतर्गत परिसर स्वच्छ करण्याचे काम सुरू होते.अशावेळी येथील फुटपाथलगत एक व्यक्ती झोपल्याचे सहाय्यक आयुक्त अण्णा बोदडे यांना दिसून आले. त्यांनी तातडीने त्या व्यक्तीची चौकशी केली. चौकशी केल्यानंतर ही व्यक्ती बीड येथील असून मुलगा सांभाळत नसल्याने बेवारसपणे रस्त्याच्या कडेला मिळेल त्या ठिकाणी, मिळेल ते खाऊन आयुष्य जगत असल्याचे बोदडे यांच्या निदर्शनाला आले. त्यांनी तातडीने त्या व्यक्तीची संपूर्ण माहिती घेतली. आस्थेने विचारपूस केली. आणि महापालिकेच्या वतीने चालवण्यात येणाऱ्या निवारा केंद्राचे प्रमुख एम. ए. हुसेन यांच्याशी संपर्क साधला.

हुसेन यांना समक्ष घटनास्थळी बोलावून घेऊन त्या व्यक्तीची संपूर्ण आरोग्य तपासणी करण्यासाठी वायसीएम रुग्णालयात दाखल केले. वायसीएम रुग्णालयामध्ये व्यक्तीची संपूर्ण तपासणी करण्यात आली. सहाय्यक आरोग्य अधिकारी बी. बी. कांबळे, मुख्य आरोग्य निरीक्षक शांताराम माने व डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानचे स्वयंसेवक या मोहिमेत सहभागी होते.त्यानंतर या व्यक्तीला निवारा केंद्रामध्ये दाखल करण्यात आले आहे. आता या व्यक्तीला कुठेही धूळ-मातीत, रस्त्याच्या कडेला आयुष्य व्यतीत करण्याची गरज नाही. महापालिका निवारा केंद्रांमध्ये या व्यक्तीची संपूर्ण जबाबदारी घेतली जाणार आहे असे बोदडे यांनी सांगितले.

अण्णा बोदडे याबाबत म्हणाले, स्वच्छ सर्वेक्षण मोहिम ही केवळ परिसर स्वच्छ करण्यापुरतीच मर्यादित ठेवून चालणार नाही. तर, या परिसरात राहणारा प्रत्येक माणूस निरामय आयुष्य जगतो का हे देखील पाहणे गरजेचे झाले आहे.रस्त्याच्या कडेला बेवारसपणे एखादी व्यक्ती आयुष्य जगत असेल तर डोळसपणाने  अशा व्यक्तींबद्दल जागरूक राहणे गरजेचे आहे. ही जबाबदारी पाळली तरच आपला परिसर सर्वांगाने आरोग्यमय आणि स्वच्छ होणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.